आज थंडावणार प्रचार तोफा

0

बंगळुरू – कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराचे सूप आज वाजणार आहे. दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांनी कानडी मुलूख ढवळून निघाला. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी ठिकठिकाणी प्रचार सभा आणि रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे.

रोड-शो होणार
भाजपने प्रचाराच्या अखेरच्या दिवशी पक्षाचे अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बी.एस.येडियुरप्पा यांच्या रोड शोचे आयोजन केले आहे. काँग्रेसनेही प्रचाराच्या नियोजनात कोणतीही कसर ठेवलेली नाही. अखेरच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहचण्यासाठी पक्षाने नेत्यांच्या प्रचार सभा आणि रोड शोचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या बदामी मतदारसंघात रोड शो करून आपल्या प्रचाराची सांगता करणार आहे.

उमेदवाराचे निधन
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासमोर भाजपने कडवे आव्हान निर्माण केले आहे. २२३ जागांसाठी येत्या १२ मे रोजी मतदान होणार आहे. जयानगर मतदारसंघातील भाजप उमेदवार बी.एन.जयकुमार यांच्या निधनामुळे तेथील मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.

१५ जाहीर सभा

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीने कर्नाटक निवडणुकीतला प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १५ जाहीर सभांना संबोधित केले. यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी अखेरच्या टप्प्यात प्रचाराच्या रणधुमाळीत उतरल्या होत्या.