लंडन : यंदाच्या विश्वकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडने १०४ धावांच्या मोठ्या फरकाने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळविला. दरम्यान आज दक्षिण आफ्रिका दुसरा तर बांगलादेश पहिलाच सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. आज बांगलादेशविरुद्ध दक्षिण आफ्रिका विजय मिळवण्याच्या दृष्टीने उतरणार आहे.
बांगलादेशला चांगल्या कामगिरीची आशा
२०१५ च्या विश्वकप स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारणाºया बांगलादेश संघ यावेळी त्यापेक्षा सरस कामगिरी करण्यास उत्सुक आहे. भारताविरुद्ध सराव सामन्यात मंगळवारी कर्णधार मशरफी मुर्तजाला स्नायूच्या दुखापतीने सतावले होते, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत तो संघाचे नेतृत्व करेल, अशी आशा आहे. मुर्तजा म्हणाला,‘अशा स्थितीत सुरुवातीचे एक-दोन षटके गोलंदाजी करताना त्रास होतो. त्यानंतर मात्र सर्व सुरुळीत होते.’ तमीम इक्बाल आफ्रिकेविरुद्धच्या लढतीपूर्वी हा सलामीवीर फलंदाज फिट होण्याची आशा आहे. या दोन्ही संघांदरम्यान सन २००२ पासून आतापर्यंत २७ एकदिवसीय सामने झाले असून त्यापैकी दक्षिण आफ्रिकेने १८ सामने जिंकले आहेत. बांगलादेशला केवळ तीन सामन्यांमध्ये विजय मिळविता आला आहे. या दोन्ही संघांमधील शेवटच्या तीन लढतींपैकी सर्व सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत. या दोन्ही संघांदरम्यान विश्वचषकामध्ये आतापर्यंत तीन सामने झाले असून दक्षिण आफ्रिकेने दोन, तर बांगलादेशाने एका सामन्यामध्ये विजय मिळविलेला आहे. या दोन्ही संघांना आतापर्यंत विश्वचषक जिंकता आलेला नाही.विश्वचषकामध्ये दक्षिण आफ्रिकेने २८४ धावा अशी सर्वाेच्च धावसंख्या उभारली असून बांगलादेशची २५१ ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.