नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर कॉंग्रेसच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शंका घेण्यात आलेली आहे. पराभवानंतर कॉंग्रेसमध्ये हालचालींना वेग आले आहे. पराभव स्वीकारून राहुल गांधी यांनी राजीनामा दिला आहे, मात्र पक्षाच्या नेत्यांनी तो फेटाळला आहे. परंतु राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम असून त्यांनी नवीन अध्यक्ष शोधण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. दरम्यान आज संध्याकाळी दरम्यान राहुल गांधी यांच्या निवासस्थानी कॉंग्रेस नेत्यांची बैठक बोलविण्यात आली आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, प्रियंका गांधी वड्रा, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला आणि सचिन पायलट राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचले असून त्यांची चर्चा सुरु आहे. काही अटींवर राहुल गांधी राजीनाम्याच्या निर्णयावरुन माघार घेऊ शकतात असे बोलले जात आहे. राहुल गांधी यांनी आज संध्याकाळी आपल्या निवासस्थानी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे.
राहुल यांनी शनिवारनंतर कोणत्याही राजकीय कार्यक्रमास हजेरी लावलेली नाही. ते काँग्रेसच्या नव्या खासदारांनादेखील भेटलेले नाहीत. या निवडणुकीत फार थोडय़ा जागांमध्ये वाढ झाली असली, तरी १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पक्षाचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. त्यामुळे देशातील या सर्वात जुन्या पक्षाची सूत्रे आता गांधी घराण्याबाहेरील नेत्याच्या हाती दिली जावीत, अशी ठाम भूमिका राहुल गांधी यांनी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी शनिवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत पक्षाच्या नेत्यांनी राहुल यांचा प्रस्ताव एकमताने फेटाळला असला तरी गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीनेच पक्षाध्यक्षपद सांभाळावे, या मतापासून राहुल यांना परावृत्त करण्यात काँग्रेस नेत्यांना यश आलेले नाही.