उद्या ‘काटे की टक्कर’; भारत ऑस्ट्रेलियाशी भिडणार !

0

लंडन: विश्वचषक स्पर्धेत भारताने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून बाजू भक्कम केली आहे. भारताचा दुसरा सामना उद्या रविवारी सर्वच बाबीने बलाढ्य अशा ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. विश्वचषक स्पर्धेचे विजेते म्हणून टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ प्रबळ दावेदार आहेत. सध्या तरी या सामन्याचे संभाव्य विजेते म्हणून भारतीय संघाला पसंती आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने उत्कृष्ट कामगिरी केली होती. विंडीजविरोधात ४ बाद ३८ धावा अशी स्थिती झाली असताना देखील नाईल आणि स्मिथच्या चिवट खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २८८ धावांचे आव्हान उभे केले होते. त्यानंतर गोलंदाजी व क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी करत कांगारुंनी विंडीजवर १५ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियन संघाच्या खेळाडूंमध्ये ऐन मोक्याची क्षणी खेळ उंचावण्याची क्षमता आहे.

भारतीय संघाकडे चार अष्टपैलू खेळाडू असून त्यांच्यामुळे फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण बळकट झाले आहे. तर, भारतीय फिरकीपटू विरुद्ध संघाच्या फलंदाजांवर अंकुश ठेवत बाद करत आहेत. त्यामुळे विरुद्ध संघाला डावाच्या अखेरच्या षटकात मोठी धावसंख्या उभारणे आव्हानात्मक जात आहे. ऑस्ट्रेलियन संघाच्या कोणत्याही डावपेचाला प्रत्युत्तर देण्याची क्षमता टीम इंडियाकडे आहे. विश्वचषक स्पर्धा सुरु होण्यापूर्वी भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान दोन एकदिवसीय सामन्याच्या मालिका झाल्या होत्या. यामध्ये ऑस्ट्रेलियातील मालिका भारताने आणि भारतातील मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली होती.