महापालिका भवनासमोर ‘नो पार्किंग’चे उल्लंघन

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर ‘नो पार्किंग’ असून देखील भर रस्त्यात वाहने लावण्याचे प्रताप दररोज होतात. शहराच्या मुख्य प्रशासकीय भवनासमोर ही अवस्था असेल. तर शहरातील इतर भागांमध्ये काय अवस्था असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील 28 वाहतूक विभागांमार्फत वाहतुकीच्या नियमांबाबत, रस्ता सुरक्षेबाबत विविध मोहिमा, उपक्रम राबविण्यात आले.

पुणे वाहतूक विभागाने 23 एप्रिल ते 7 मे दरम्यान रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा केला. शेकडो वाहनांवर केलेल्या कारवाईत पंधरवड्यात लाखो रुपयांचा महसूल वाहतूक विभागाला मिळाला. पण ही कारवायांची मोहीम केवळ ठराविक दिवसच चालली. त्यानंतर कारवायांचा पूर ओसरला, आता ही मोहीम संथ वाहणाऱ्या कृष्णामाई सारखी झाली आहे.

वाहतूक विभागाच्या वतीने शनिवारी (दि. 5) महापालिकेसमोर नो पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या 20 वाहनांवर कारवाई करण्यात आली. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून लावण्यात आलेल्या वाहन चालकांकडून दंड देखील वसूल करून वाहनांना जॅमर लावण्यात आले पण ही कारवाईची मोहीम केवळ एकच दिवस चालली. त्यानंतर वाहतूक विभाग आणि वाहनचालक दोघांनी देखील ‘जैसे थे’ ची जागा घेतली. वाहने रस्त्यावर लावल्यामुळे रस्त्याने जाणा-या वाहनांना अडथळा होतो. परिणामी वाहतूक कोंडी होण्याचे हे मुख्य कारण होते. तसेच रस्तात लावलेल्या वाहनांमुळे रस्त्याच्या बाजूने जाणा-या नागरिकांना देखील रस्त्यामधूनच आपला मार्ग काढावा लागत आहे.