गणरायाचे विसर्जन करतांना हलखेडा येथील दुर्देवी घटना 

युवकाचा तलावात बुडून मृत्यू - १८ तासानंतर सापडला मृतदेह

कुऱ्हा – काकोडा । प्रतिनिधी
गुरुवारी गणेश भक्तांकडुन श्री गणरायाला भक्ती भावाने निरोप देत असतांनाच हलखेडा येथील युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाला . यामुळे पवार कुटुंब व ग्रामस्थांवर मयत युवकाला भावपूर्ण निरोप देण्याची वेळ आली . तर या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे .

हलखेडा येथील फिरोज गव्हाणसिंग पवार (वय – २५ ) हा युवक गुरुवारी सांयकाळी आपल्या घरातील श्री गणरायाचे विसर्जन करण्यासाठी सिन फाटा येथील पाझर तलावात गेला होता . मात्र, यावेळी त्याचा पाण्यात तोल गेल्याने तो पाण्यात बुडाला . यावेळी उपस्थितांनी याबाबतची माहिती पोलीस पाटील अनेश बनेशबाबु पवार यांना दिली . त्यानुसार पोलीसांनी त्याचा पोहणाऱ्यांकडुन शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र, रात्र झाल्याने सकाळी फिरोज याचा चांगदेव येथील नावाडी संघटनेच्या पोहणार्‍यांकडुन पुन्हा शोधकार्य हाती घेतले असता दुपारी १२ वाजेच्या सुमारास फिरोज याचा मृतदेह आढळला . याबाबत पोलीस पाटील अनेश पवार यांच्या खबर वरून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . तर मयत याचे पश्चात पत्नी व तिन मुले असल्याचे ग्रामस्थान बोलले जात आहे .ग्रामस्थांवर श्री गणराया सोबतच त्याला भावपूर्ण निरोप देण्याची वेळ आल्याने गावात शोककळा पसरली आहे .