सुरक्षा रक्षकांनी तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नानी

0

श्रीनगर-जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला आहे. बुधवारी माछिल सेक्टर येथे भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करताना सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. नियंत्रण रेषेवरून भारतात शिरणाऱ्या या दहशतवाद्यांच्या बचावासाठी पाकिस्तानी सैन्यानेही गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे.

आणखी काही दहशतवादी येथे लपले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी बांदिपोरा जिल्ह्यात मंगळवारी दहशतवाद्यांनी राष्ट्रीय रायफल्सच्या सैन्य शिबिरावर सुरु असलेला गोळीबार बुधवारी थांबला आहे. स्थानिक पोलिसांनी सांगितले की, बांदीपोरा जिल्ह्यातील हाजिन भागात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेली चकमक थांबली आहे.

दरम्यान, पोलिसांनी या शिबिरात आत्मघाती हल्ला झाला नसून ही अफवा असल्याचे म्हटले आहे. दहशतवाद्यांनी शिबिरावर ग्रेनेड फेकले तसेच स्वयंचलित हत्यारांचा वापर केला. याला आपल्या सुरक्षा रक्षकांनी मोठ्या धैर्याने उत्तर दिले. मात्र, या हल्ल्यामध्ये कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. शोध मोहिमेदरम्यान या क्षेत्राला चारही बाजूंनी घेरण्यात आले आहे.