तीन दहशतवाद्यांचा खात्मा, दोन जवान जखमी

0

सुरक्षा पथके, दहशतवाद्यांमध्ये चकमक

श्रीनगर : जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या छत्ताबल भागात शनिवारी सकाळपासून दहशतवादी आणि सुरक्षा पथकांमध्ये सुरु झालेली चकमक सायंकाळी संपली. या चकमकीत भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्याचा खात्मा केला असून, एका नागरीकाचाही मृत्यू झाला आहे. तर सीआरपीएफचे दोन आणि एक पोलिस जखमी झाला. सफाकदल तबेला छत्ताबल भागात दहशतवादी एका घरात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा पथकांनी या भागाला घेराव घातला व शोधमोहीम सुरु केली. लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केल्यानंतर या चकमकीला सुरुवात झाली.

जवानांवर स्थानिकांकडून दगडफेक
चकमकीत उशीरपर्यंत दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरु होता. चकमक संपल्यानंतर सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून दहशतवाद्यांच्या तीन मृतदेहांसह तीन एके47 रायफल आणि दारूगोळा जप्त केला. सुरक्षा अधिकार्‍यांनी सांगितले की, दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू असताना काही स्थानिक सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक करत होते. सुरक्षा दलाने या स्थानिकांना रोखण्याचा प्रयत्न करताना अनेक नागरिक जखमी झाले. त्यापैकी एका गंभीर जखमीला रूग्णालयात दाखल केले असता तो मरण पावला. दरम्यान, रूग्णालय सूत्रांनी मयत अदिल अहमद यादूचा मृत्यू अपघातात झाल्याचे म्हटले असून, स्थानिकांनी मात्र त्यास सुरक्षा दलांनी गोळ्या घातल्याचा आरोप केला आहे.

दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर
घटनास्थळी काही दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर शनिवारी सकाळी या भागात शोधमोहीम राबविण्यात आली. यावेळी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर देत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. काश्मीरमध्ये मागील 24 तासात तीन नागरीकांचीही हत्या झाली आहे. शुक्रवारी रात्री दहशतवाद्यांनी बारामुल्ला जिल्ह्यात एका व्यक्तिची गोळी झाडून हत्या केली होती.