प्रकाशा येथे मंदिराजवळ ट्रक- पीकअपचा अपघात

नंदुरबार l शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे कोकणमाता मंदिराजवळ ट्रक आणि पीकअप यांच्यात झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी, ७ रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली जखमींना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातानंतर ट्रक चालक आणि क्लीनर हे दोघेही फरार झालेले आहेत. दरम्यान, घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी भेट दिली. याप्रकरणी शहादा पोलिसात अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.

सविस्तर असे, मध्यप्रदेशातून गुजरात राज्यात लग्न समारंभासाठी लागणारे साहित्य तसेच धान्य घेऊन पीकअपला (क्र.एम. पी. ०९, एच. एच. ५५११) प्रकाशा गावाजवळ ट्रक (क्र. जी. जे. ५ बी.एक्स. ४४८३) ने ७ मे रोजी

 

सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जोरदार धडक दिली. त्यात पीकअपमध्ये चालकासह एकूण पाच जण होते. त्यापैकी तीन जण जागीच ठार झाले तर अन्य दोन जन गंभीररित्या जखमी झाले आहेत. अपघात एवढा मोठा भीषण होता की, कानठळ्या बसवणारा आवाज झाला होता. त्यात पीकअप पूर्णतः चक्काचूर झाली. प्रकाशा पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. जेसीबी यंत्राच्या साह्याने ट्रकमध्ये अडकलेल्या पीकअपला बाहेर काढले. अपघातस्थळी रक्ताच्या सडा पडलेला होता. पीकअपमधील सर्व साहित्य रस्त्यावर अस्ताव्यस्त पडले होते.

दरम्यान, जखमींना मदत करण्यासाठी प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे संदीप खंदारे, रामा वळवी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, सुरेश पाटील, स्थानिक पत्रकारांसह ग्रामस्थांनी मदत केली. त्यानंतर रस्त्यावरची वाहतूक सुरळीत सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.

मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

अपघातात हेमराज अंजने (वय ३९, रा. सुरत), मनोज घाट्या (वय ४२, रा. सुरत), भगवानभाई गोविंद पंचुले (वय ४८, रा. गोंदिया, मध्यप्रदेश) हे तिन्ही जण जागीच ठार झाले.