अलिगढ-अलिगढ मुस्लिम विद्यापीठात मोहंमद अली जीना यांचे छायाचित्र लावण्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अलिगढ जिल्ह्यातील इंटरनेटसेवा शुक्रवारी बंद करण्यात आली. शुक्रवारी दुपारी दोनपासून शनिवारी मध्यरात्रीपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येईल, असे जिल्हाधिकारी चंद्रभूषण सिंह यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियातून पसरणाऱ्या अफवांना पायबंद घालण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी म्हटले आहे. काही समाजविघातक शक्ती इंटरनेटवरून आक्षेपार्ह व्हिडीओंद्वारे अफवा पसरवून सामाजिक सलोखा बिघडवणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्याने हा निर्णय घेल्याचे सिंह म्हणाले.
अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थी आणि पोलिस यांच्यात बुधवारी वाद झाल्यानंतर हे विद्यार्थी विद्यापीठाच्या बाब ए सय्यद गेटवर धरणे धरून बसले आहेत. गेले दोन दिवस त्यांनी वर्गांमध्ये उपस्थिती लावलेली नाही. या विद्यार्थ्यांनी या गेटवरच शुक्रवारचा नमाज अदा केला. यावेळी प्राध्यापक आणि विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुखही त्यांच्यात सहभागी झाले.
स्टुडंट युनियनच्या कार्यालयातून मोहम्मद अली जीना यांचे छायाचित्र हटवण्यात यावे, या मागणीसाठी उजव्या संघटनांनी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये प्रवेश करून गोंधळ घातल्याचा या विद्यार्थ्यांचा आरोप आहे. त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. स्थानिक खासदार सतिश गौतम यांनी अलिगढ विद्यापीठाला हे छायाचित्र हटवण्याची मागणी करणारे पत्र दिल्यानंतर हा वाद सुरू झाला होता. विद्यापीठाच्या सर्व आजीव सदस्यांची छायाचित्रे स्टुटंड्स युनियनच्या कार्यालयात लावण्यात आली आहेत. जीना हे विद्यापीठाचे संस्थापक सदस्य असल्याने त्यांना हा सन्मान फाळणीच्या आधीपासून देण्यात आला असल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू तारीक मन्सूर यांनी पोलिसांच्या लाठीमारात जखमी झालेल्या तीन विद्यार्थ्यांची जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आंदोलन विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवला. तर विद्यापीठातील प्राध्यापकांच्या संघटनेने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून तातडीने उच्च स्तरीय समिती नेमून या घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी केली.