कॉंग्रेस नेत्यांना महिनाभर टीव्ही बंदी : रणदीप सुरजेवाला

0

नवी दिल्ली: लोकसभेच्या पराभवानंतर समाजवादी पक्षानंतर कॉंग्रेस पक्षानेही आपल्या कुठल्याही प्रवक्त्याला टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या चर्चासत्रात भाग न घेण्याच्या निर्णय घेतला आहे. या बाबतचे ट्वीट कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केले आहे. तसेच देशाच्या कुठल्याही वृत्तवाहिन्या आणि संपादकांनी कार्यक्रमात कॉंग्रेसच्या प्रवक्त्यांना बोलावू नये अशी विनंती कॉंग्रेसने केली आहे.

कॉंग्रेसच्या प्रवक्त्यांना टीव्हीवर येण्याची बंदी का करण्यात आली हे स्पष्ट करण्यात आले नाही. रणदीप सुरजेवाला यांच्या ट्वीट नंतर राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. निवडणुकीत पराभव झाल्यामुळे राहुल यांनी आपला राजीनामा सादर केला आहे आणि ते आपल्या राजीनाम्यावर ठाम आहे. या पुढे कॉंग्रेस पक्षाचा अध्यक्ष गांधी घराण्याचा नसावा असेही राहुल यांनी स्पष्ट केले आहे.

राहुल यांनी पक्षाच्या जेष्ठ नेत्याबाबत नाराजी व्यक्त करत त्यांच्या भेटीही नाकारल्या आहेत. यामुळे सुद्धा चर्चासत्रामुळे वेगळे वळणही लागू शकते आणि याचा फटका काँग्रेसला बसू शकतो, यामुळे पक्षाने हा निर्णय घेतला असावा अशी चर्चा आहे. या मुळे नव्या जबाबदाऱ्या आणि नवी भूमिका काय असावी या विचारात असलेलेल्या कॉंग्रेसला धोका पत्करायचा नाही, आणि म्हणूनच पक्षाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.