मुंबई: राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. निकाल लागून एक आठवडा उलटला मात्र मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु असल्याने सरकार स्थापनेचे घोडे अडले आहे. शिवसेनेकडून मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे वारंवार बोलले जात आहे, तर भाजप मुख्यमंत्री पद सोडायला कोणत्याही परिस्थितीत तयार नाही. दरम्यान कालपासून ट्विटरवर भाजप आणि शिवसेना समर्थकांमध्ये सोशल मीडियावर युद्ध सुरु आहे. शिवसेना तसेच भाजप विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात ट्विटरवर #RejectFadnavisForCM हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणात ट्रेण्ड केला जातो आहे, तर देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांनी देखील #MaharashtraNeedsDevendra हा हॅशटॅग वापरत मुख्यमंत्री पुन्हा देवेंद्र फडणवीसच व्हावे यासाठी ट्रेण्ड सुरु केला आहे. .
शिसेनेने ठरल्याप्रमाणे सत्तेत 50-50चा आग्रह धरत अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाचीही मागणी करत असल्याने भाजपासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यातच शिवसेनेचे नेते संजय राऊत वारंवार शिवसेनेचाचं मुख्यमंत्री होणार असून त्याचा शिवतिर्थावर शपथविधी संपन्न होईल असा दावा करत आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, महाराष्ट्राला नव्या सरकारची आवश्यकता आहे आणि ते लवकरच बनेल, एवढेच सांगितले. मात्र युतीचे सरकार येणार की भाजप स्वबळावर सरकार स्थापन करणार या बाबतची संदिग्धता कायम ठेवली. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील राजकीय सद्यस्थितीवर चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले.