शहर महामार्ग चौपदरीकरणात अडीच किमीचा समांतर रस्ता

0

चौपदरीकरणाच्या निविदेतच समांतर रस्ता समाविष्ट : दोन टप्प्यात कामे

जळगाव : शहरातुन जाणार्‍या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांतर्गत अडीच किलोमीटरचा समांतर रस्ता प्रस्तावित असल्याची माहिती न्हाई विभागाच्या सुत्रांनी दिली. दरम्यान महामार्ग चौपदरीकरणाचे हे काम दोन टप्प्यात केले जाणार असुन लवकरच या कामाला पुन्हा सुरवात होणार आहे.

जळगाव शहराच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या समांतर रस्त्यासंदर्भात संभ्रम निर्माण केला जात आहे. याबाबत ‘दै. जनशक्ति’ने वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी न्हाई विभागाचे अधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, जळगाव शहरातुन जाणार्‍या महामार्गाचे चौपदरीकरणाला सुरवात झाली आहे. पावसामुळे काही दिवस काम बंद होते. मात्र आता या कामाला पुन्हा लवकरच सुरवात होणार आहे. तसेच समांतर रस्त्याचाही प्रश्न या चौपदरीकरणाच्या माध्यमातुन निकाली निघणार आहे. हे काम दोन टप्प्यात होणार असुन पहिल्या टप्प्यात चौपदरीकरणा दरम्यान अडीच किलोमीटरचा समांतर रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यात आकाशवाणी चौक ते प्रभात चौफुली आणि मानराज पार्क ते बांभोरी पूलापर्यंत असा अडीच किमीचा समांतर रस्ता राहणार आहे. तसेच प्रभात चौक, गुजराल पेट्रोल पंप आणि दादावाडी जंक्शन या तीन ठिकाणी अंडरपास राहणार असल्याची माहिती न्हाईच्या अधिकार्‍यांनी दिली. दुसर्‍या टप्प्यात देखिल समांतर रस्त्याचे काम प्रस्तावित आहे.