भुसावळ प्रतिनिधी ।
शेतजमीन खरेदीनंतर सातबारा उताऱ्यावर शेतकऱ्याचे नाव लावून देण्याचे काम करून देण्यासाठी १५ हजारांची लाच मागून तडजोडीअंती १२ हजार रुपयांची लाच घेतांना भुसावळ सजाचे कोतवाल रवींद्र लक्ष्मण धांडे (वय ५४, रा. भुसावळ) व खासगी कर्मचारी हरी देविदास ससाणे (वय ४४, रा. आंबेडकर नगर, भुसावळ) यांना जळगाव एसीबीने तहसील कार्यालयात मंगळवारी दुपारी अटक केली होती. लाचखोरांना बुधवारी भुसावळ अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केल्यावर त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील ३४ वर्षीय
तक्रारदाराने २०२२ मध्ये भुसावळ तालुक्यातील कुन्हे पानाचे येथे स्वतःच्या नावाने दोन एकर शेतजमिनीची खरेदी केल्यानंतर शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी प्रकरण दिल्याने कुन्हा मंडळाधिकारी योगीता पाटील यांनी त्रुटी काढून कोतवालांशी भेटण्यास सांगितले. कोतवालाने मंडळाधिकाऱ्यांकडून काम देण्यासाठी १५ हजार रुपये सुरुवातीला मागून १२ हजारात तडजोड केली. तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणी कुन्हे पानाचे येथील मंडळाधिकारी योगीता पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांचीही चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले