नवी दिल्ली-यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक तरुण खेळाडूंनी आपल्या दमदार प्रदर्शनाने स्वतःची वेगळी ओळख तर निर्माण केली आहे. दुसरीकडे टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलेल्या दोन माजी दिगग्ज खेळाडूंसाठी हे आयपीएल सत्र खूप वाईट ठरले आहे.
कधीकाळी आपल्या धडाकेबाज फलंदाजीने गोलंदाजांच्या मनामध्ये धडकी भरवणारे युवराज सिंग आणि गौतम गंभीर यंदाच्या आयपीएलमध्ये खराब फॉर्ममध्ये आहेत. भारताच्या विश्वचषक विजयात मोलाची भूमिका बजावणारे हे दोन्ही फलंदाज सध्या आपल्या फॉर्मसोबत झगडताना दिसतायेत. आयपीएल संपल्यानंतर हे दोघं फलंदाज निवृत्ती स्वीकारतील अशी क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे.
आयर्लंड, इंग्लंड आणि अफगाणिस्तानच्या मालिकेसाठी तिन्ही प्रकारातील भारतीय संघाची निवड झाली. यामध्येही अपेक्षेप्रमाणे दोघांना स्थान मिळालं नाहीच. त्यामुळे गंभीर आणि युवराजसाठी भारतीय संघाचे दरवाजे आता कायमस्वरुपी बंद झाल्याचं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावरही दोघं निवृत्त होणार असल्याच्या चर्चा आहेत, दबक्या आवाजात त्यांनी निवृत्ती घ्यावी अशी मागणीही होत आहे.