दक्षिण काश्मिरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा !

0

शोपियान: दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात लष्कराच्या जवानांना आज 2 दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. चकमक स्थळावरून शस्त्र आणि अन्य स्फोटक साहित्य हस्तगत करण्यात आल्याचीही माहिती आहे. परिसरात शोधमोहीम अद्यापही सुरू आहे.

शोपियान जिल्ह्यातील हिंदसीतापूर भागात दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानुसार जवानांनी परिसराची नाकेबंदी केली आणि शोधमोहीम सुरू केली. शोधमोहीम सुरू असतानाच दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात लष्कराच्या जवानांनी जशास तसे उत्तर दिले आणि दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. यापूर्वी शुक्रवारी सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीत इश्फाक अहमद नावाचा एक दहशतवादी ठार झाला होता. त्याच्याकडेही मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा मिळाला होता.