नागेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या दोन विश्वस्तांनी दिला राजीनामा
वरणगांव परिसरात उलट - सुलट चर्चेला आले उधाण, अनेकांच्या भुवया उंचावल्या
वरणगांव । प्रतिनिधी
वरणगांव परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री नागेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या दोन विश्वस्तांनी आपल्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा प्रकारामुळे परिसरात उलट – सुलट चर्चेला उधाण आले असुन अनेकांच्या भुवया राजकीय क्षेत्रातील मातब्बरांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.
वरणगांव व परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री. नागेश्वर महादेव मंदिराच्या विश्वस्त मंडळ विश्वस्त मंडळाचे अध्यक्षपदी चंद्रकांत हरी बढे ( सर ) असुन या मंदिराच्या जागेत भव्य मंदिराची इमारत उभारून साडेतीन शक्ती पिठाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच या इमारती मध्ये भक्त निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र,भक्तांनी या भक्त निवासाकडे पाठ फिरवल्यामुळे भक्त निवासाची दुरावस्था झाली होती. यावर उपाय म्हणून विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत बढे ( सर ) यांनी हि इमारत एका खासगी अग्निशामक दलाच्या प्रशिक्षण चालकास भाडेतत्त्वावर दिली आहे. तसेच इतर मोकळी जागा एका गौरक्षण संस्थेलाही भाडेतत्वावर देण्यात आली असून त्या ठिकाणी सदरहु संस्थेने कामकाज सुरू केले आहे. तर शासनाच्या तिर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत मंदिराच्या समोर सभामंडप उभारण्यात आला आहे . मात्र, असे असुनही संस्थेच्या दोन विश्वस्तांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा देणे सर्वांना अचंबित करण्यासारखे आहे.
या दोन विश्वस्तांनी दिला राजीनामा
श्री. नागेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट ( रजि. क्र. ए.७१५ ) या संस्थेच्या विश्वस्त मंडळात श्री. सुपडु नारायण सोनवणे (पहेलवान ) व शंकर हिरालाल पटेल या दोन जणांची सन – २०२२ ते २०२७ या कालावधी पर्यंत निवड झाली होती. मात्र, त्यांनी वर्षभराच्या कालावधीत राजीनामा दिल्याने भक्त व इतरांमध्ये आश्चर्ययुक्त विविध चर्चांना उधाण आले आहे. तर प्रकृती अस्वस्थ राहत असल्याच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचे राजीनामा पत्रात नमूद केले असुन दोन्ही विश्वस्तांनी आपल्या पदाचा राजीनामा संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत हरी बढे ( सर ) व धर्मदाय आयुक्तांकडे पोष्टाद्वारे पाठवला आहे .