मुंबई : शिवसेनेसोबत २५ वर्षे राहिलेलो आहे, त्यामुळे ऋणानुबंध असणारच असे म्हणत छगन भुजबळ यांनी उद्ध ठाकरेंनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, माझ्या पडत्या काळात शिवसेनेने दोन शब्द चांगले बोलले, याचे समाधानही आहे, असे भुजबळ म्हणाले. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भुजबळ सांताक्रुझमधील त्यांच्या घरी आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
रुग्णालयातून घरी परतलेल्या भुजबळांना पत्रकारांनी पहिली प्रतिक्रिया विचारल्यानंतर, ते म्हणाले, झाले मोकळे आकाश, अशी भावना व्यक्त केली.
पहिला फोन पवार साहेबांचा
जामीन मिळाल्यानंतर पहिला फोन शरद पवारांचा आला, असे भुजबळांनी यावेळी सांगितले. राष्ट्रवादीच्या ‘हल्लाबोल’ यात्रेच्या समारोप सभेला जाणार का? “प्रकृती ठीक झाली तर १० जूनच्या सभेला जाईन. मला परत एकदा हॉस्पिटलमध्ये जावं लागेल, शस्त्रक्रिया करावी लागेल. त्यातून बरं वाटलं, तर शंभर टक्के मी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला हजर राहीन”, असे छगन भुजबळ म्हणाले.
सत्य समोर येईल
सत्य सगळ्यांच्या समोर येईल. तुम्ही ते शोधायला हवं. महाराष्ट्र सदन आज सगळ्यांच्या पसंतीला उतरलं आहे. त्याचा मला आनंद आहे. भाजपच्या खासदारानं सांगितलं होतं, महाराष्ट्र सदन सुंदर आणि बनानेवाला अंदर.”, असे भुजबळांनी महाराष्ट्र सदन प्रकरणावर भाष्य केले.