पावडरच्या स्फोटामुळे दोन कर्मचारी जख्मी

 वरणगांव आयुध निर्माणीतील घटना - कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ 

वरणगांव । प्रतिनिधी

वरणगांव आयुध निर्माणीत रविवारी रात्री स्फोटक पावडरचा स्फोट झाल्याने दोन कर्मचारी जख्मी झाले. दोघानांही तातडीने वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर महिनाभरापूर्वी लागलेल्या आगीच्या घटनेनंतर स्फोटक पावडरचा स्फोट झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

 

वरणगांव आयुध निर्माणीतील प्राईमिंग सेक्शन या विभागात रविवारी रात्री ८. ३० वाजेच्या सुमारास स्फोटक पावडरचा स्फोट झाला. या स्फोटात प्रशांत पाटील व चेतन पाटील हे दोन कर्मचारी जख्मी झाल्याने दोघांपैकी एकाला ऑल इज वेल रुग्णालय बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) तर दुसऱ्याला रिदम हॉस्पीटल भुसावळ येथे तातडीने उपचारार्थ दाखल करण्यात आले. सद्यस्थितीत आयुध निर्माणील अल्प प्रमाणात असलेल्या कर्मचार्‍यांवर कामाचा ताण वाढला असुन धोका असलेल्या विभागात संमिश्र कामगारांवर कामाची जबाबदारी सोपवली जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. तर रात्री घडलेल्या स्फोटाच्या घटनेमुळे मोठी अप्रिय घटना टळली असली तरी आयुध निर्माणीच्या सुरक्षा विभागाने या प्रकाराची तात्काळ दखल घेऊन उपाय योजना करणे गरजेचे झाले आहे .

 

*???????? महिनाभरापूर्वी लागली होती आग*

आयुध निर्माणीत महिनाभराच्या कालावधीत वाढलेल्या तापमानामुळे गवताला मोठ्या प्रमाणात आग लागली होती. हि आग आटोक्यात आणण्यासाठी जळगांव, जामनेर, भुसावळ, सावदा, फैजपूर, रावेर व वरणगांव येथील अग्निशामक बंबानी किमान चार तास प्रयत्न करुन आग नियत्रंणात आणली होती.