बीड : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज चौथा स्मृती दिन आहे. यानिमित्ताने बीड जिल्ह्यातील परळी इथल्या गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देताना राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भावूक झाले. गोपीनाथ मुंडेंसोबतचे अनेक किस्से त्यांनी उपस्थितींना ऐकवले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, खासदार छत्रपती संभाजीराजे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, जलसंधारणमंत्री राम शिंदे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार, खासदार उपस्थति होते.
‘गोपीनाथ मुंडेंबद्दल बोलताना अनेक आठवणी डोळ्यासमोर येतात. त्यांच्या जाण्याने माझ्यासाठीच नाही, तर सर्वांसाठीच एक मोठी पोकळी निर्माण झाली. ते एक फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड होते,’असे म्हणत उदयनराजे भावूक झाले.
अचानक मंत्रीपद दिले
‘औरंगाबादला पक्षाची बैठक होती. ती संपल्यानंतर नाशिकमार्गे जायचे ठरवले. नाशिकमध्ये असताना गोपीनाथ मुंडेंचा फोन आला. त्यांनी सांगितले उद्या मुंबईला या, मी म्हटल काही खास काम आहे का, ते म्हणाले तुम्ही या, तुम्हाला यावे लागेल. त्यांना सांगितले काही खास असेल तर आत्ताच येतो. मुंडे साहेब म्हणाले आत्ता नको, उद्या या, तुमचा शपथविधी आहे,’ असा किस्सा उदयनराजेंनी सांगितला.
कॉलर उडविणे शिकलो
‘खऱ्या अर्थाने वडिलांनंतर मला कुणी जवळ केले असेल, तर ते मुंडे साहेब होते. त्यामुळे आज इथे छत्रपती म्हणून नाही, तर मुंडे साहेबांचा मुलगा म्हणून इथे आलो आहे. असे सांगत उदयनराजेंचा कंठ दाटून आला. ‘प्रत्येकाला उत्सुकता असते, उदयनराजे कॉलर का उडवतात. त्याचे कारण सांगतो. लोकांसाठी जो माणूस झटतो आणि आयुष्यभर काम करतो, त्यालाच कॉलर उडवण्याचा अधिकार. त्यामुळे मुंडे साहेब कॉलर उडवायचे म्हणून मी देखील कॉलर उडवतो,’ असे उदयनराजेंनी सांगितले.