गांडूळ संबोधणार्‍यांच्या तोंडात बोळे का?

0

जळगाव/धुळे । शेतकरी संवाद सभा शेतकर्‍यांना कर्जमुक्ती केलीच पाहिजे त्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे. ही मागणी गेल्या दहा वर्षांपासूनची आहे. विरोधक विरोध करतात, त्यात ए.टी.पाटील असो वा अजितदादा पवार असो ते मात्र शिवसेना ही दोन तोंडी गांडूळ म्हणून आरोप करतात, मग अजित पवार यांना किती तोंडे आहेत हे माहित नाही. सात वर्षापुर्वी सत्तेत असतांना शेतकरी कर्जमुक्तीसाठीचा मुद्दा मांडला होता. त्यावेळी यांनीच अपशब्द बोलून शेतकर्‍यांची अवहेलना केली होती. आज शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा विषय आल्यानंतर शेतकर्‍यांना मदतीसाठी न धावणारे अजितदादा पवार यांच्या तोंडात भ्रष्टाचाराचा बोळा कोंबला आहे का? असा सवाल वजा टोला उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीला दिला. शिवसेना शेतकर्‍यांची बाजू मांडण्यासाठी शेतकर्‍यांकडून बोलत आहोत. आज खान्देशातील जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांशी संवाद साधण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दौरा काढला होता. सोबत परीवहन मंत्री दिवाकर रावते, सहकार राज्य मंत्री ना. गुलाबराव पाटील, पर्यावरण मंत्री रामदास कदम होते. सुरूवातील उध्दव ठाकरे यांनी पाळधी येथे शेतकर्‍यांशी संवाद सांधला व धरणगावकडे रवाना झाले. त्यांनी यानंतर पारोळा व धुळे येथेही सभा घेतल्या.

शिवसेनेची शेतकरी व कष्टकरी यांच्याशी बांधिलकी
धरणगाव येथील आठवडे बाजार चौकात दुपारी 1 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शेतकरी संवाद सभा झाली. यानिमित्त संपूर्ण धरणगाव शहर व परिसर भगवामय झाले होते. जय भवानी जय शिवाजी घोषणांनी शहर दणाणले. मोठ्या उत्साहाने हजारोंच्या संख्येने शेतकरी व कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजराने बैलगाडीवरती बसवून वाजत गाजत मिरवणूक काढून, हातात शिंगाडे घेऊन फाटाकांची अतिषबाजी करुन स्वागत करण्यात आले. राज्यसरकारने दिड लाखापर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. परंतु कर्जमाफी देतांना काही चुकीचे निकष लावण्यात आले. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. राज्यभर दौरे करुन संवाद मेळाव्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे मनोगत जाणून घेत आहे. शिवसेनेने सरकारला शेतकर्‍यांपुढे झुकायला लावले. शेतकरी व कष्टकरी यांच्याशी शिवसेना बांधिलकी आहे. कर्जमाफी झाली मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे अभिनंदन केले. मात्र प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या हातात काहीही मिळाले नाही. दीड लाख रुपये कोणाच्याही खात्यावर जमा नाही. 10 हजार रूपये कोणालाही मिळाले नाही. आज पावसाची गंभीर परिस्थिती आहे. दुबार, तिबार पेरणीचे संकट आहे. शेतकरीच्या शेतमालाला हमी भाव नाही असा आरोप ठाकरे यांनी केला.

जलसंपदा मंत्र्यांवर डागली तोफ
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी किती पाणी आणले माहित नाही. सिंचन योजनांचा महापूर आणून गाजावाजा करणारे ज्यावेळी शेतकर्‍यांनी चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेतले तर त्यांना कोणत्याच पद्धतीने हमी भाव दिला नाही. मग काय उपयोग या सिंचन प्रकल्पाचा, असे सांगून ठाकरे यांनी जलसंपदा मंत्र्यांवर टिकास्त्र सोडले. ते पुढे बोलतांना म्हणाले की, सत्तेला काही वर्ष होता त्यांनी नोटबंदी सारखे घातक निर्णय केंद्रसरकारने घेतला. या निर्णयामुळे नोट टंचाईमुळे शेतकर्‍यांची जिल्हा बँकेला टाळे लावले ‘घामाचा पैसा काळा कसा आहे?’ ग्रामिण अर्थव्यवस्था कोलमंडली सरकार मात्र मोठमोठ्या त्यांच्या जाहिराती लावतात. शेतकर्‍यांच्या घरी बँकेचे अधिकारी कर्ज वसुलीसाठी जात आहेत. शिवसेना त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देईल. जिल्हानिहाय, तालुकानिहाय, गावागावात जाऊन किती शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळाली यांची संपुर्ण माहिती घेणार आहोत. शेतकर्‍यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे. काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी टिका-टिप्पणी करु नये, शेतकर्‍यांसाठी आम्ही सरकारमध्ये आहोत, असेही उद्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले.

यांची होती उपस्थिती
धरणगाव येथील सभेत सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, दिवाकर रावते, रामदास कदम, संपर्कप्रमुख रविंद्र मिर्लेकर आमदार किशोर पाटील, महानंदा पाटील, जिल्हा शिवसेनाप्रमुख गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील, नगराध्यक्ष सलीम पटेल, जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, शिवसेना तालुका प्रमुख गजानन पाटील, शिवसेना शहराध्यक्ष राजेंद्र महाजन, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील, माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ यांच्यासह सर्व नगरसेवक व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी आमदार हरिभाऊ महाजन यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. तर भानुदास विसावे यांनी उद्धव ठाकरे यांना हनुमान गदा भेट दिली.

फक्त निषेध का ?
दरम्यान, धुळे येथील येथील बाजार समितीच्या प्रांगणात झालेल्या शेतकरी संवाद मेळाव्यातही उध्दव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेला जाणार्‍या भाविकांच्या बसवर हल्ला केला़ हिंदुस्थानवर हल्ले होत असतांना निषेध कसला करताय, सरळ दहशतवाद्यांना गोळ्या घाला अशी मागणी त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की, बाळासाहेब असतांना त्यांनी अमरनाथ यात्रेला अडथळा आला तर हज यात्रा होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती़ पण सध्या केंद्र सरकार अतिरेकी हल्ल्यांनंतर केवळ निषेधावरच समाधान मानत आह़े तर आम्ही राज्यभर जिल्हा बँकांसमोर ढोल बडविल़े परंतु तरीही कजर्माफीचा लाभ दिला गेला नाही तर मंत्रालयासमोर ढोल बडवू असा इशारादेखील त्यांनी दिला. भाजप नेते शेतकर्‍यांना ‘साले’ म्हणतात, मग तुमच्यात अन् अजित पवारांमध्ये फरक काय? असा प्रश्नदेखील त्यांनी केला. याप्रसंगी पर्यावरण मंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री दादा भुसे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार निलम गोर्‍हे, बबन थोरात, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, महानगरप्रमुख सतिश महाले आदी मान्यवर उपस्थित होते.