शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा भाजपला टोला
मुंबई : भाजपचा पोटनिवडणुकांमध्ये पराभव होतोय, तर निवडणुकांमध्ये विजय होतोय. त्यामुळे ईव्हीएमबाबत जो सर्वांच्या मनात संशय आहे, तो भाजपने बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन काढून टाकावा, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा विजय, असो अशी टीका ट्विटरवरून केली. विरोधकदेखील ही ईव्हीएमची किमया आहे, अशी टीका करत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीदेखील एकदाच या देशात बॅलेट पेपरने मतदान घ्या, असा सल्ला देत भाजपला टोला हाणला.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. जे जिंकले आहेत, त्यांचे अभिनंदन करतो, असे ते म्हणाले. शिवाय मुख्यमंत्री कुणीही झाला, तरी त्याने मराठी माणसाचा आदर करावा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. ज्या राज्यामध्ये भाजपची राजवट नव्हती. तिकडे त्यांना यश मिळाले. मात्र ज्या राज्यातील लोकांना भाजपच्या राजवटीचा अनुभव आहे त्यांचे मत वेगळे असू शकते, असा टोलादेखील त्यांनी भाजपला हाणला. तसेच कर्नाटकमधील जनतेला एकदा यांचा अनुभव घ्यावासा वाटला असेल म्हणून भाजपला जनतेने निवडून दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. उद्धव ठाकरे म्हणाले, की निवडणुकीचे अंदाज चुकतात त्यामुळे आता कोणी धाडस करणार नाही अंदाज लावायचे. भाजपची घोडदौड निवडणुकामध्ये दिसते आणि ते पोटनिवडणुकीत हरत आहेत, असा टोलादेखील उद्धव ठाकरे यांनी हाणला.