शिंदे-भाजपविरोधात उध्दव ठाकरेंचे शिवगर्जना अभियान  

उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी अनंत गिते, वरूण सरदेसाईंवर

मुंबई | प्रतिनिधी

निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आता थेट जनतेत जाण्यावर भर दिला आहे. याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरेंनी आता शिवगर्जना अभियानाची घोषणा केली आहे.  उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे हे शिवगर्जना अभियान 25 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीदरम्यान चालणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हे अभियान राबवले जाणार आहे. यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या माध्यवर्ती कार्यालयाकडून पत्रकही जारी करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत शिवसैनिक, नेते, उपनेते, युवासेनेचे पदाधिकारी राज्यातील जनतेशी थेट संवाद साधणार आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांत शिवगर्जना अभियान राबवण्याची जबाबदारी शिवसेना नेते अनंत गिते, संजना घाडी, विजय औटी आणि वरुण सरदेसाईंवर देण्यात आली आहे.

संकटाच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची रणनीती
शिवसेनेचे नाव आणि चिन्हाचा वादामुळे उद्धव ठाकरे सध्या संकटात अडकल्याचे चित्र बघायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर जनतेतील आपली प्रतिमा आणि मतदारांवरील पकड आणखीन मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे सातत्याने प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही जर विरोधात गेला तर नवा पक्ष कमी कालावधीत जनतेत रुजवण्याच्या दृष्टीनेही ठाकरे गटाकडून रणनीती आखली जात आहे. हे अभियान त्याच प्रयत्नांचा एक भाग असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.