नवी दिल्ली-जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिदवर गोळीबार करुन त्याचा हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या दोघांनी एका व्हिडिओद्वारे या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
दोन आठवड्यापूर्वी संसदेपासून जवळ असलेल्या कॉन्स्टिट्यूशनल क्लबच्या आवारात उमर खालिदवर अज्ञात व्यक्तीने गोळी झाडून त्याच्या हत्येचा प्रयत्न केला. हल्लेखोराने गावठी पिस्तुलने उमरवर दोन गोळ्या झाडल्या. मात्र त्याचा नेम चुकला. सुदैवाने उमर या गोळीबारातून बचावला. उमरवर गोळीबार करणारा हल्लेखोर हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या आधारे तपासही सुरु केला होता.
सोशल मीडियावर दोन तरुणांचा व्हिडिओ व्हायरल झाला. या तरुणांनी व्हिडिओत उमरवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. दर्वेश सापूर आणि नवीन दलाल मंदोठी अशी या तरुणांची नावे होती. दिल्ली पोलिसांनी या व्हिडिओचा देखील तपास सुरु केला होता. व्हिडिओतील दोन तरुणांचा शोध घेण्यासाठी हरयाणा व पंजाब पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. दिल्ली पोलिसांचे ३० जणांचे पथक लुधियानात संशयितांचा शोध घेत होते. अखेर रविवारी दोघांनाही हरयाणातून ताब्यात घेतले आहे. ‘त्यांच्या दाव्यांची चौकशी सुरु असून चौकशीनंतर सत्य समोर येईल’, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या व्हिडिओत दोन्ही तरुणांनी ‘आम्ही सुप्रीम कोर्ट आणि संविधानाचा आदर करतो. पण जेएनयूतील या टोळीचा खात्मा करण्याची गरज आहे. आमच्या पूर्वजांनी सांगितले होते की पिसाळलेल्या कुत्र्यांना ठार मारले पाहिजे. उमर खालिदवरील हल्ला ही स्वातंत्र्य दिनी देशवासियांना दिलेली भेट होती, असा म्हटले होते.