अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमिवर जळगाव शहरासह जिल्ह्यात अघोषित संचारबंदी

0

जिल्ह्यासह शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त; शांततेच्या आवाहनाला सोशल मीडियावर प्रतिसाद

जळगाव: गेल्या काही वर्षापासून अयोध्या येथील राममंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयात कामकाज सुरु होते. शनिवारी ठरल्याप्रमाणे सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयातर्फे निकाल जाहीर करण्यात आला. या निकालादरम्यान अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी त्यानुसार जिल्ह्यात बाहेरुन एसआरपी कंपनी व दोन हजाराच्यावर होमगार्ड मागविण्यात आले आहेत. .सलग दोन दिवस हा बंदोबस्त कायम राहणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी ला दिली. सोशल मिडीयावर अफवा पसरविणार्‍यांवर सायबर सेल लक्ष ठेवून होते. विशेष पोलीस महानिरिक्षक छेरींग दोरजे दर तासांनी पोलीस अधीक्षक उगले यांच्याकडून जिल्ह्याचा आढावा घेत होते. तर अधीक्षक उगले नियंत्रणा कक्षात ठाण मांडून सर्व ठिकाणच्या परिस्थितीचा तसेच वातावरणाचा आढावा घेत होते. दरम्यान या निकालामुळे जिल्हयासह शहरात अघोषित संचारबंदीप्रमाणे एकंदरीत वातावरण असल्याचे दिसून आले.

संवेदनशील रावेरला सर्वधर्मीय रॅलीतून शांततेचे आवाहन

अयोध्याच्या निकालाची नेमकी तारिख सर्वोच्च न्यायालयाकडून जाहीर करण्यात आली नव्हती. मात्र 10 ते 17 नोव्हेंबर दरम्यान कधीही निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्यातर्फे नियोजन करण्यात आले होते. अधीक्षक उगले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात तसेच संवेदनशील गावांमध्ये शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या. त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणार्‍या इसमांची यादी जिल्हा पोलीस दलाने तयार केली असून त्यांच्यावर हालचालींवर पोलीस दलाची करडी नजर आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर शनिवरी सकाळी रावेर येथे हिंदू मुस्लीम वस्तीत सर्वधर्मीय व पंच कमिटीतर्फे शांतता प्रभात रॅली काढण्यात आली. घोडा गाडीवर (टांगा) लाऊडस्पीकर लावून शहरात शांततेचे आवाहन करण्यात आले. या रॅलीत शांतता समितीचे सदस्य, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, नगराध्यक्ष यांच्यासह स्ट्रायकिंग फोर्स, आरसीपी प्लाटून याचा समावेश होता.

गुप्तचर यंत्रणाही होत्या परिस्थितीवर लक्ष ठेवून

  • जिल्ह्यात सीमीचे जाळे, जातीय दंगलीचे ठिकाण, संवेदनशील शहर व गावे यांचे हॉटस्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. जळगाव, रावेर, भुसावळ, साकळी, अडावद येथे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले असून काही लोकांवर गुप्तचर व पोलीस यंत्रणेची नजर ठेवण्यात आली. दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांनी दोन दिवसासाठी जिल्ह्यात कलम 144 प्रमाणे जमावबंदी आदेश लागू केला आहे. या काळात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र येणार नाही याची सूचना देण्यात आली आहे.

-शुक्रवारी रात्री निकाल शनिवारी सकाळी 10.30 वाजता असल्याचे जाहीर झाल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून ठिकठिकाणी शहरात बंदूकधारी तसेच पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. रेल्वे स्थानक तसेच बसस्थानक येथे बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निकालाच्या पार्श्वभूमिवर शहरात सकाळी 12 वाजेपर्यंत तणावपूर्ण शांतता होती, नेहमीची वर्दळ असणार्‍या ठिकाणी म्हणजेच रेल्वे स्टेशन तसेच बसस्थानक याठिकाही नेहमीपेक्षा गर्दी कमी होती. कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर निघणे टाळले होते. त्यामुळ शहरात इतरत्रही रस्त्यावर दुपारी 12 वाजेपर्यंत नेहमीप्रमाणे वर्दळ दिसून आली नाही. तांबापुरा, भिलपुरा चौकी, तसेच इच्छादेवी चौक यासह इतर संवेदनशील भागांमध्ये क्यूआरटी पथक तसेच एसआरपीची प्लाटून तैनात करण्यात आली होती.

विशेष पोलीस महानिरिक्षकही घेत होते आढावा

निकालाच्या पार्श्वभूमिवर विशेष पोलीस महा निरीक्षक छेरींग दोरजे दर एक तासांनी पोलीस अधीक्षकांकडून आढावा घेत होते. पोलीस अधीक्षकांनी शहरातील संवेदनशील भागात भेट दिल्यानंतर 11 वाजता नियंत्रण कक्षाचा ताबा घेतला. तेथून प्रत्येक उपविभागीय अधिकारी व प्रभारी अधिकार्‍यांकडून ते माहिती जाणून घेत होते. त्याशिवाय फिक्स पॉईंट व हॉटस्पॉटवरील कर्मचारी थेट नियंत्रण कक्षाच्या संपर्कात होते. उगले यांच्या दिमतीला स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम, जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक डी.एम.पाटील, सीआरओ पवार, राखीव निरीक्षक सुभाष कावरे, सहायक निरीक्षक आखेगावकर, उपनिरीक्षक दिलीप पाटील आदी अधिकार्‍यांचा ताफा होता. अनुचित प्रकार घडल्यास शस्त्रधारी कमांडो पथक राखीव ठेवण्यात आले होते.

पोलिसांच्या सुट्टया दोन दिवसांसाठी रद्द

बकरी इद आणि अयोध्या निकाल हे दोन प्रकरणे सध्या संवेदनशील आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत. सोशल मिडीयावरुन अफवा पसरविणारे संदेश यावर विशेष नजर ठेवण्यात आली. बहुतांश गृप अ‍ॅडमीनने सर्व सदस्यांना ब्लॉक केले आहे. गृपवर फक्त अ‍ॅडमीन यांचेच मेसेज येत होते. त्यात अयोध्या हा विषय नव्हता..सर्वांकडूनच शांततेचे आवाहन करण्यात आले.

बॅनर्स, प्रिंटर्स व जाहीरात एजन्सीला नोटीस

या निकालाबाबतचे अभीनंदन किंवा निषेध असे कोणतेच प्रकारचे बॅनर्स, फ्लेक्स तयार करु नयेत तसेच त्याची प्रिंटीग करु नये यासाठी बॅनर्स व प्रिंटर्स चालकांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्याशिवाय बॅनरच्या जाहीरात एजन्सीलाही नोटीस बजावण्यात आली होती. सोशल मीडिया, जल्लोष, निषेध, मिरवणूक, गुलाल उधळणे याला निर्बंध घालण्यात आल्याने शहरात सर्वत्र शांतता दिसून आली.

निकाल व ईद ए मिलाद यामुळे सर्वत्र पोलिसांचा सशस्त्र बंदोबस्त लावण्यात आला आहे. हा बंदोबस्त दोन दिवस राहिल. मिरवणुका, फटाके फोडणे व जल्लोषाला बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी संयम ठेवून शांतता ठेवली. धार्मिक भावना दुखावण्याचा बुध्दीपुरस्कर उददेशाने शब्द प्रयोग करू नये, कोणत्याही प्रकारचे जातीय दंगलीच्या अनुषंगाने जुने व्हिडीओ, फोटो पुन्हा प्रसारित करून अफवा पसरवू नये. सूचनाचे उल्लंघन केल्यास, गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करून कोर्टात हजर केले जाईल. – डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक