नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या पहिला अर्थसंकल्प आज सादर केला. यात अर्थसंकल्पात सर्वसामान्य आयकरदात्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. पाच लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नसण्याची फेब्रुवारीमध्ये दिलेली सवलत कायम ठेवण्यात आली आहे. उच्च उत्पन्नाच्या करदात्यांवर मात्र अधिभाराचा बोजा वाढणार आहे. 2 कोटी ते 5 कोटी रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 3 टक्के अतिरिक्त सरचार्ज आकारण्यात येणार आहे. तर 5 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना 7 टक्के अतिरिक्त सरचार्ज लावण्यात आला आहे.
45 लाखांपर्यंत घर विकत घेतल्यास त्यावर दीड लाखांपर्यंत अतिरिक्त सूट देण्यात आली आहे. तर स्टार्टअप सुरु करणाऱ्यांसाठी ई-व्हेरिफिकेशन करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यांनाही करात विविध सूट दिली आहे.
असे आहेत स्लॅब
अडीच लाखांपर्यंत टॅक्स नसणार आहे.
अडीच लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत 5 टक्के (एकूण उत्पन्नातून अडीच लाख वजा करून)
5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत 12,500 रुपये + 20 टक्के (एकूण उत्पन्नातून 5 लाख रुपये वजा करून)
10 लाख रुपयांपेक्षा अधिक 1,12,500 रुपये + 30 टक्के (एकूण उत्पन्नातून 10 लाख रुपये वजा करून)