नवी दिल्ली: मोदी सरकार 2 च्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज सादर होत आहे. पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सितारमण लोकसभा सभागृहात अर्थसंकल्प सादर करत आहे. अर्थसंकल्पाची सुरुवात त्यांनी हिंदीत शेर मारत केला. ”यकीन हो तो कोई रास्ता निकलता है, हवा की ओट लेकर भी चिराग जलता है”, असे म्हणत अर्थसंकल्प सादरीकरणाला सुरुवात केली.
कालच अर्थमंत्र्यांनी संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला होता. यात जीडीपी ७ टक्क्यांनी वाढले असल्याचा दावा करण्यात आला होता. पुढील काळात तेलाच्या किंमतीत घट होती असे सर्वेक्षण अहवालातून सांगण्यात आले आहे.
पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे उद्दिष्ट
यावेळी बोलताना निर्मला सीतारामन यांनी एक ट्रिलयन डॉलर अर्थव्यवस्था होण्यास ५५ वर्ष लागली, पण आम्ही फक्त पाच वर्षात एक ट्रिलियन डॉलर्स त्यात जोडले असे सांगितले. पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे उद्दिष्ट पुढच्या काही वर्षांमध्ये नक्की गाठू असा विश्वास व्यक्त केला. तसंच या वर्षातच तीन ट्रिलियन डॉलरचे लक्ष आपली अर्थव्यवस्था गाठेल असेही सांगितले. पाच वर्षांपुर्वी भारतीय अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावर होती. पण आता भारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था झाली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले.
भारताच्या प्रगतीचा अर्थसंकल्प आहे. नव्या भारताचा हा अर्थसंकल्प आहे असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले. स्थिर आणि प्रगतीशील भारतासाठी हा अर्थसंकल्प असल्याचं त्यांनी यावेळी म्हटले. लोकांनी दिलेल्या जनमताच्या आधारे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आम्ही आमचे ध्येय गाठणार असा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केली.
२०२४ पर्यंत हरघर जल
देशातील प्रत्येक घराला पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र शासन जलशक्ती अभियान राबविणार आहे. २०२४ पर्यंत ‘हरघर जल’ पोहोचविण्याचे ध्येय शासनाने ठेवले असल्याचे यावेळी अर्थमंत्र्यांनी सांगितले.
देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सितारमण या पहिल्या अर्थमंत्री आहेत. यापूर्वी 28 फेब्रुवारी 1970 साली इंदिरा गांधी यांनीच सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी, पंतप्रधानपदी असतानाही, त्यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त पदभार होता. त्यामुळे स्वतंत्र भारतानंतर स्वतंत्रपणे बजेट सादर करणाचा मान पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून निर्मला सितारमण यांना मिळाला आहे. निर्मला सितारमण यांनी लंडनमध्ये बीबीसी वर्ल्ड सर्व्हीस आणि सहायक अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम केले आहे.