सरकारच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन

0

सोलापूर : सरकारी अनास्था उघड करण्यासाठी सोलापुरातील एका सामाजिक कार्यकर्त्याने आज अनोखे आंदोलन केले. स्मार्ट सिटी योजनेची अंमलबजावणी करण्यात सरकारच्या अपयशाचा निषेध करण्यासाठी हा कार्यकर्ता चक्क रस्त्यावर कमोडवर बसला होता. उघड्यावर शौच होत असल्याने त्याने हा निषेध व्यक्त केला. शौचालयाच्या भांड्यावर बसून हे आंदोलन त्याने केले.

राजू पॅटी असे आंदोलन कर्त्याचे नाव आहे. सोलापूरचा स्मार्ट सिटीत समावेश होऊन दोन वर्षाचा कालावधी लोटला, तरीही नागरिक बिनधास्तपणे शहरातील सरकारी रुग्णालये , कार्यालये , मैदानांवर उघड्यावर शौचास बसतात. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हागणदारीमुक्त देश, स्वछ भारतचा नारा देत आहेत. त्याचा राजू पॅटी यांनी कमोडवर बसून निषेध व्यक्त केला.

राज्य आणि केंद्र सरकार केवळ घोषणाबाजी करतं, काम मात्र काही करत नाही, असं बोलत निषेध करण्यासाठी त्याने हवेत खेळणीच्या बंदुकीने गोळीबार केला. शहर हागणदारी मुक्त करण्यात दुर्लक्ष केलं जात असल्याने त्याने उघड्यावर कमोड मांडून प्रातिनिधिक आंदोलन केलं.

निवडणुकीपूर्वी भाजपने अच्छे दिन, स्मार्ट सिटी, सबका साथ सबका विकास अशाप्रकारच्या घोषणा केल्या. पण सत्तेत आल्यावर मोदी सरकारने आश्वासने पाळली नाहीत. त्यामुळे आश्वासन हवेत विरल्याने सरकारचा निषेध म्हणून राजू पॅटी यांनी खोट्या बंदुकीतून हवेत गोळीबार केला. तसंच चॉकलेट, बिस्कीट वाटप करत अनोखं आंदोलन केलं.