नवी दिल्ली: विरोधकांनी विरोध केल्यानंतर लोकसभेत जोरदार चर्चा झाल्यानंतर अखेर ‘बेकायदा कृत्यरोधी दुरुस्ती विधेयक २०१९’ (यूएपीए विधेयक) मंजूर करण्यात आले आहे. १९६७ मध्ये इंदिरा गांधी यांनीच हे विधेयक आणले होते, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या चर्चेच्या वेळी विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेसवर हल्लाबोल केला. दहशतवादी कोण? आणि दहशतवादी कोणाला ठरवायचे? याची तरतूद या विधेयकात करण्यात आली असल्याचे शहा यांनी सांगितले.
या विधेयकानुसार दहशतवादी कारवायांमध्ये भाग घेणाऱ्या आणि दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना दहशतवादी घोषित करण्यात येणार आहे, असे सांगतानाच दहशतवादाच्या वाढीसाठी रसद पोहोचविणाऱ्यांना, आर्थिक पाठबळ देणाऱ्यांना दहशतवादी संबोधायचे की नाही? असा सवाल अमित शहा यांनी केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचंही त्यांनी उत्तर दिले. देशात अनेक समाजिक कार्यकर्ते आहेत आणि ते सन्मानाने जीवन व्यतित करत आहेत. परंतु, वैचारिक आंदोलनाचं पांघरून घेऊन जे लोक अर्बन नक्षलवादाचा पुरस्कार करत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई होईलच. आमचे सरकार अशा लोकांना दयामाया दाखवणार नाही, असं शहा यांनी स्पष्ट केलं.