तरुण चेहर्‍याला मतदारांकडुन पसंती

0

आ. उन्मेष पाटील यांचा सलग १८ तास प्रचाराचा झंझावात

चाळीसगाव – (अर्जुन परदेसी ) लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. उमेदवाराचा दिवस कसा सुरू होतो? त्याची दिवसभराची प्लॅनिंग कशी असते? कार्यकर्त्यांना कशा सूचना देतात? त्यांच्या प्रचार दौर्‍यात ते लोकांशी कसा संवाद साधतात? जनता त्यांच्याकडे काय मागणी करते?, मतदार राजा त्यांना काय अपेक्षेने मतदान करणार आहे,प्रचार दौर्‍यानिमित्त काय काय गमतीजमती घडतात या सर्व प्रश्‍नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी महायुतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या दिवसभराच्या कामकाजाची माहिती देणारा हा रिपोर्ट ‘दै. जनशक्ति’च्या वाचकांसाठी देत आहोत.
रात्री तीन वाजता जळगाव दौरा आटोपून घरी येऊनही सकाळी पाच वाजेपासून आ. उन्मेष पाटील यांच्या दिनचर्येला सुरवात होते. सकाळी ६ वा. उठून दिवसभराच्या प्रचारासाठीचे नियोजन आमदार उन्मेष पाटील यांचेकडून केले जात आहे. आपल्या शिलेदारांना आवश्यक सूचना करून त्यांना येणार्‍या अडचणी त्यांनी समजावुन काही सूचना केल्या. तेवढ्यात पाळधीहून जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांचा फोन आला ‘दादा’ आम्ही बांभोरी येथे आपली वाट पाहतो आहे लवकर या, असा निरोप मिळाला. नियोजनाबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करून आ. उन्मेष पाटील ७ वा. घराबाहेर पडले. पत्नी संपदा पाटील यांनी लगबगीने उन्मेष पाटील यांच्या गाडीत लींबु शरबत भरलेल्या दोन बाटल्या व जेवणाचा डबाही दिला. कार्यकर्त्यांसोबत जेवणाला वेळ मिळाला नाही तर त्यांना प्रवासात आठवणीने जेवण द्या अशा सुचनाही संपदा पाटील यांनी केल्या. कार्यकर्त्यांना सुचना करीत सुरू झाला दिवसभराचा प्रचाराचा झंझावात.

पाळधीमधून प्रचाराला सुरुवात
बांभोरी येथे उन्मेष पाटील यांचा प्रचाराचा ताफा पोहचला. त्यावेळी सकाळचे ९.३० वाजले होते. प्रवासादरम्यान उन्मेष पाटील हे गाडीतून रस्त्यावर दिसेल त्याला जिभू तात्या अशी साद घालत आवाहन करीत होते. गाडी बांभोरी येथे पोहचली. तेथे जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी फटाके फोडुन उन्मेष पाटील यांचे स्वागत केले. बसस्थानकावर जमलेल्या कार्यकर्त्यांशी व परिसरातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर प्रचार ताफा पाळधी येथील सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरी पोहचला. तेथे चहा व नाश्ता केल्यावर पाळधीमध्ये युतीची जोरदार रॅली निघाली.

पाळधीत महायुतीचा धुमधडाक्यात प्रचार
भाजप सेना महायुतीचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ पाळधी गावात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा शिवसेना प्रमुख गुलाबराव वाघ,भाजप ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पी. सी. आबा पाटील, नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे, जि.प.सदस्य प्रतापराव पाटील,जि .प.सदस्या माधुरी अत्तरदे, धरणगाव बाजार समितीचे सभापती पुनिलाल महाजन, सचिन पवार, मुकुंद नन्नावरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. आ. उन्मेष पाटील यांचे ठिकठिकाणी माता भगिनींकडून औक्षण करण्यात येत होते. पाळधी गावात निघालेल्या रॅली मध्ये भाजप सेना महायुतीचे कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी प्रकाश पाटील, प्रमुख संजय पाटील, गजानन पाटील, आबा माळी, शरद कासार,विजय देसाई, दिपक सावळे, सुरेश पाटील, मुकेश भोई, कडू धनगर, अविष्कार पाटील, भाऊसाहेब पाटील, गुलाबराव पाटील, बापू ठाकरे, शिरीष बायस, कैलास माळी, प्रकाश ठाकूर, किशोर झंवर चोरगाव, नरेंद्र नन्नवरे, वर्षा झोपे, शीतल साळुंखे, पूनम शींनकर, देवयानी महाजन, भारती नारखेडे, मनीषा इंगळे, दीपक सुर्यवंशी, गिरीश बर्‍हाटे, अमोल चव्हाण, पूनिलाल महाजन यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.या दौर्‍यात चांदसरचे सरपंच तथा माजी पंचायत समितीचे सभापती सचिन पवार यांचा वाढदिवस असल्याने सहकार मंत्री गुलाबराव पाटील व जिल्हा शिवसेना प्रमुख गुलाबराव वाघ यांनी उन्मेष पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला.

ग्रामीण भागात झंझावती प्रचार रॅली
चांदसर गावात सरपंच सचिन पवार, मंजुषा पवार व कार्यकर्त्यांकडून उन्मेष पाटील यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सहकार मंत्री गुलाबराव पाटील उन्मेष पाटील यांना निवडून आणण्यासाठी जास्तीत जास्त मतदान करून घ्यावे असे आवाहन केले. आज दिवसभरात पाळधी दोनगाव, चांदसर, कवठळ, चोरगाव येथे रॅली काढण्यात आली. त्यानंतर ३० गाड्यांचा ताफा धार, शेरी येथे पोहचला. येथे गावात प्रचार झाल्यानंतर दत्त मंदिरात कार्यकर्त्यांनी दुपारचे जेवण घेतले. त्यानंतर ना. गुलाबराव पाटील यांचा निरोप घेत जळगावकडे ते मार्गस्थ झाले.

व्यापार्‍यांशी संवाद

रात्री प्रचार दौर्‍यातील शेवटचे खेडे साळवा केल्यानंतर ना. गुलाबराव पाटील, पी. सी. आबा पाटील यांच्याशी पुढील नियोजनाबाबत धावती चर्चा करून आमदार उन्मेष पाटील यांनी सरळ जळगाव एमआयडीसीमधील बालाणी लॉन्स गाठले. त्यांनी सर्वप्रथम भाजपाच्या उद्योग व व्यापारी आघाडीचे राज्याध्यक्ष कंवरलाल संघवी यांचे आशीर्वाद घेतले. यानंतर आ. राजूमामा भोळे यांनी जळगाव शहर व परिसरातील व्यापार्‍यांची व औद्योगिक वसाहतीत सुरू असलेल्या विकासाच्या कामांचा आढावा मांडला. यावेळी उद्योजक व व्यापार्‍याच्या अडचणी व भूमिका उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अरुण बोरोले यांनी मांडली. याप्रसंगी उद्योजकांच्या प्रश्नांना व त्यांच्या सूचना बाबत खुला संवाद साधला. यानंतर महायुतीचे उमेदवार आमदार उन्मेष दादा पाटील यांनी आपली भूमिक उद्योग व व्यापारी समस्या यांची मला जाण आहे. याकरिता येत्या काळात जास्तीत जास्त सोयी सुविधा देण्यासाठी किमान दोन महिन्यात एकदा आपणाशी प्रामाणिकपणे सुसंवाद ठेवला जाईल असे आश्‍वासन त्यांनी दिले.