भुसावळ प्रतिनिधी l
रविवारी मध्यरात्री रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने अंदाजे १० कोटी रुपयांचे केळी बागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या वादळी पावसाचा तालुक्यातील १५ गावांना फटका बसला आहे. नुकसानग्रस्त भागात ठिकठिकाणी वादळामुळे झाडे उन्मळून पडली आहे. तर रात्री काही भागात वीज पुरवठा खंडित झाला होता.
रविवारी मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसाचा फटका तालुक्यातील १५ गावातील २३० शेतकऱ्यांच्या २४१.७६ हेक्टर एवढ्या शेत शिवाराला बसला आहे. या वादळाच्या तडाख्याने कापणीला आलेल्या केळी बागांचे नुकसान झाले असून खोडे मोडून पडलेले आहेत. सुमारे ९ कोटी ६७ लाख ४ हजार रुपयांच्या नुकसानीचा अंदाज तालुका कृषी अधिकारी मयूर भामरे यांनी वर्तवला आहे.
बाधीत गावे, शेतकरी संख्या व कंसात बाधीत क्षेत्र
चोरवड -३०(२०), अजनाड-२८ (१८), खिरवड – १५(१२), अभोडा बुद्रूक – १० (१२), जिनसी-६ (५), लालमाती-२ (३), गुलाबवाडी – ६ (५), विवरे खुर्द-१५(१८), वडगाव-७(८), रावेर- ५ (३), खिरोदा प्र. रावेर-१(०.७६), खिरोदा प्र. यावल-१८ (१४) कळमोदा-४०(५६), चीनावल- ३५ (४९), जानोरी – १२ (१८)
तात्काळ पंचनामे सुरू
नुकसानग्रस्त केळी बागांचे नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषि विभागातर्फे सोमवारीपासून सुरू करण्यात आले आहेत. अंदाजे १० कोटींच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.. नुकसानीचा अंतीम अहवाल तयार झाल्यावर तो वरिष्ठांना पाठी येणार आहे. रावेर तहसीलदार बंडू कापसे, यांनी सांगितले