2025 पर्यंत सर्व कृषीपंपांना सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा!

0

वाणिज्यिक, औद्योगिक वीजदरही कमी होणार
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

मुंबई :- येत्या 2025 पर्यंत राज्यातील सर्वच सुमारे 45 लाख कृषीपंपांना टप्प्याटप्प्याने सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्याचे राज्यशासनाचे नियोजन आहे. त्यामुळे कृषीपंपांना दिवसातसेच पुरेशी व स्वस्त वीज मिळावी हीशेतकरी बांधवांची मुख्य मागणी पूर्ण होईल,सोबतच क्रॉस सबसीडी कमी झाल्यानेप्रामुख्याने औद्योगिक व वाणिज्यिक वीजदरसुद्धा कमी होतील अशी माहिती राज्याचेऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी दिली.

ऊर्जेचे संवर्धन व व्यवस्थापना मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील विविध संस्थांना पारितोषिक देण्यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणच्या (महाऊर्जा) वतीने आयोजित 12 व्या राज्यस्तरीय पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री गिरीश बापट, केंद्र शासनाच्या ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिअंसीचे महासंचालक श्री. अभय बाकरे,महाऊर्जाचे महासंचालक डॉ. विपीन शर्मा,अतिरिक्त महासंचालक पुरुषोत्तम जाधव, पारितोषिक निवड समितीचे व्ही. व्ही. कानेटकर व्यासपीठावर उपस्थित होते.

ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले,की कृषी पंपांसोबतच राज्यातील नळ योजना व उपसा जलसिंचन योजना संपूर्णपणे सौर ऊर्जेवर आणण्याची अंमलबजावणी सुरु आहे.गावांमधील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचे 7.5 एचपी पर्यंतचे पंप लवकरच सौर पंपांनी बदलण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. राज्यात 14,400 मेगावॉटचे अपांरपरिक ऊर्जा निर्मिती करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. येत्या डिसेंबर 2019 पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोठ्या संस्थांनी सौर ऊर्जा प्रकल्प उभारावेत. ही वीज शासन खरेदी करेल. सोबतच केंद्र शासनाच्या ईईएसएल (एनर्जी ईफिशिअंसी सर्व्हीसेस लिमिटेड) कंपनीसोबत 200 मेगावॉट क्षमतेचे राज्यात सौर प्रकल्प उभारण्याचे करार झालेआहेत. राज्यात 17 एप्रिल रोजी 23700 मेगावॉट विजेची उच्चांकी मागणी नोंदविण्यात आली व तेवढाच वीजपुरवठा करण्यात आला.ही पारेषण व वितरण यंत्रणेसाठी उल्लेखनीय बाब असल्याचेही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले. ऊर्जा संवर्धन व व्यवस्थापन क्षेत्रात सहभागी स्पर्धकांनी आजपर्यंत सुमारे 3928 कोटी रुपयांचे ऊर्जाबचत साध्य केली आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.