नवी दिल्ली : मोदी सरकारकडून देशभरात होणाऱ्या लोकसेवा परीक्षांच्या नियमांमध्ये अमूलाग्र बदल केला जाण्याची शक्यता आहे. या अंतर्गत नोकरी आणि केडर निवडण्यासाठी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे पुस्तकी ज्ञानासह व्यवहारिक ज्ञानही तपासले जाणार आहे. परीक्षेच्या निकालानंतर होणाऱ्या प्रशिक्षणाच्या आधारवर ते कोणत्या सेवेत जाण्यासाठी पात्र आहे, हे ठरविले जाणार आहे.
प्रशिक्षणादरम्यान चांगली कामगिरी केल्यास चागले पद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानंतर हे नवे बदल याच वर्षी लागू होतील असे सांगण्यात येत आहे. या नव्या सिस्टमनुसार अशी शक्यताही आहे की, प्रशिक्षणादरम्यान सुमार कामगिरीमुळे परीक्षेतील टॉपरला आयएएस केडर मिळू शकणार नाही, तर त्याच्यापेक्षा कमी रँक असलेल्या उमेदवाराने ट्रेनिंगमध्ये चांगली कामगिरी केली तर तो आयएएस बनू शकतो.
असे ठरविले जाणार रँक
पंतप्रधान कार्यालयाच्या निर्देशानुसार, कर्मचारी प्रशिक्षण विभागाने ही नवी यंत्रणा लागू करण्यासंदर्भात अनेकांकडून सल्ले मागितले आहेत. या प्रस्तावानुसार, उत्तीर्ण उमेदवारांना फाऊंडेशन कोर्स पूर्ण केल्यानंतर आणि त्यात मिळालेल्या गुणांवरच केडर आणि नोकरीचं ठिकाण दिलं जाईल. जर नवे नियम लागू झाले तर ट्रेनिंगनंतरच कोणाला कोणती सेवा आणि कोणत्या राज्याचं केडर मिळणार हे ठरणार आहे. ट्रेनिंगमध्ये मिळालेले गुण यूपीएससीच्या अंतिम निकालात जमा होतील, त्यानंतर त्यांचा रँक ठरणार आहे.
सध्याच्या पद्धतीनुसार सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवाराला आयएएस, आयपीएस, आयएफएस या सेवा निवडण्याची मुभा होती. तसेच केंद्रीय सेवेतील ‘अ’ श्रेणीच्या नोकरीसाठी याच परीक्षेतून उमेदवार निवडले जातात.
प्रशिक्षणात बदल
सत्तेत आल्यावर मोदी सरकारने या सेवांच्या प्रशिक्षणात महत्त्वाचे बदल केले. २०१५ मध्ये नव्या आयएएस अधिकाऱ्यांना प्रशिक्षणादरम्यान केंद्रात तीन महिने सहाय्यक सचिव म्हणून ट्रेनिंग देणं अनिवार्य केले होते. यादरम्यान त्यांना केंद्रीय योजना आणि त्यांच्या अंमलबजावणीबाबत सखोल माहिती दिली जाते. अग्रवाल समितीने प्रशिक्षणातील बदलाआधी १८० आयएएस अधिकाऱ्यांमध्ये जाऊन त्यांच्यासोबत चर्चा केली होती. यामध्ये १२७ पुरुष आणि २७ महिला आयएएस अधिकाऱ्यांचा समावेश होता.
अग्रवाल समितीच्या शिफारशी यंदा लागू होणार
– प्रशिक्षणाचा कमाल कालावधी एक वर्ष करावा
– गावांमध्ये जास्त काळ राहण्यासाठी अधिकाऱ्यांना जास्त वेळ मिळावा
– प्रशिक्षणासाठी परदेशात पाठवण्याच्या पर्यायावरही विचार व्हावा
– फाऊंडेशन कोर्सचा अभ्यासक्रम बदलावा, सध्याच्या घडामोडींवर जास्त भर द्यावा
– ट्रेनिंगदरम्यान कमीत कमी परीक्षा व्हाव्यात, सध्याची यंत्रणेनुसार 300 गुणांची परीक्षा व्हावी