नवी दिल्ली । देशातील सायबर सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकाच दिवसात दोन महत्त्वपूर्ण सरकारी संकेतस्थळे हॅकरकडून हॅक करण्यात आली आहे. यूपीएससीच्या संकेतस्थळाच्या होमपेजवर गेल्यावर एक कार्टून कॅरेक्टर डोरेमॉनचा फोटो दिसत आहे. त्याच्यावर लिहिले होते डोरेमॉन, फोन उठाओ. या पेजच्या खालच्या भागावर ‘आय एम स्टूपीड’ लिहले होते. आणि त्याच्या पार्श्वभागावर डोरेमॉन या सिरियलच्या शीर्षकगीताची ट्रॅक वाजत होती. तर दुसरीकडे आधारकार्डचे संकेतस्थळही हॅक केल्याची माहीती मिळत आहे.
2500 रुपयांच्या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने बनवू शकतो नवे आधार कार्ड
आधार कार्डच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रीत केले असताना, यूआयडीएआई ने म्हटले होते की, आधारसाठी बनावट चेहरा ओळख उघड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. त्यातच आता आधार कार्डचा सॉफ्टवेअरच हॅक केला गेला आहे. विशेष म्हणजे 2500 रुपयांत तो सॉफ्टवेअर उपलब्ध होत आहे. जगातील कोणत्याही कोपर्यातील व्यक्तिचे आधार कार्ड बनविले जाऊ शकते. 3 महिन्यांच्या चाचणीनंतर हफिंग्टन पोस्ट डॉट इनने हा दावा केला आहे. यासाठी जगभरातील पाच विशेष तज्ज्ञांची यासाठी मदत घेवून हा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने आधारची सुरक्षेच्या संदर्भातील डेटा लॉक केला जाऊ शकतो व नवीन आधार कार्ड तयार करण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.