नवी दिल्ली- आरबीआयचे गव्हर्नर ऊर्जित पटेल आज संसदीय समितीसमोर हजर झाले. नोटाबंदी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका कर्जात अडकल्याने नॉन परफॉर्मिंग एसेट(एनपीए)सह विविध मुद्द्यांवर माहिती दिली आहे. पहिल्यांदा १२ नोव्हेंबर रोजी समितीसमोर हजर व्हायचे होते. परंतु ती तारीख पुढे ढकलण्यात आली होती. यावेळी ऊर्जित पटेल यांनी नोटाबंदीचा प्रभाव हा क्षणिक होता, असे म्हटले आहे.
संसदीय समितीच्या या बैठकीत पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटा चलनातून बाद करणे, आरबीआयमध्ये विविध सुधारणा, कर्जाच्या जाळ्यात अडकलेली बँकिंग सिस्टीम आणि अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानांसारख्या मुद्द्यांचा समावेश होता. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग या कमिटीचे सदस्य आहेत. तर काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एम. विरप्पा मोइली या समितीचे अध्यक्ष आहेत.