भुसावळ प्रतिनिधी l भुसावळ विधासभा मतदार संघात लेवा समाजाची मते निर्णयक आहेत. जिल्हयात जळगाव, भुसावळ व यावल तालुक्यात या समाजाचे प्राबल्य आहे. त्यातच भुसावळ केंद्रस्थानी आहे असे म्हणणे चकीचे ठरणार नाही. परंतु वर्तमान स्थिती पाहता लेवा मतदारांचा वापर केवळ राजकारणासाठी झाला आहे का ? असा प्रश्न उपस्थित होतो.
भुसावळ शहरात रेल्वेचे जंक्शन स्थानक आहे तसेच आशिया महामार्ग सुद्धा शहरातून जातो. दळणवळणाची मुबलक व्यवस्था येथे आहे. शहरात लेवा समाज बहुसंख्य आहे. काही अपवाद वगळता नगराध्यक्ष व आमदार लेवा समाजचाच राहिला आहे. शहरात लहान, मोठ्या समाजाचे नगर परिषदेच्या जागेवर सभागृह आहेत. परंतु बहुसंख्य असलेल्या लेवा समाजचे एकही सभागृह नगर परिषदेच्या जागेवर नाही हि शोकांतिका आहे.
पर प्रांतातून आलेल्या नागरिकांचे सभागृह तयार झाले आहेत परंतु लेवा समाज याबाबतीत मागे पडला आहे. हि शोकांतिका म्हणावी किंवा राजकीय अनास्था किंवा अन्य काही ? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. शहरात या समाजाच्या सभागृहासाठी काही वर्षांपूर्वी जागाही उपलब्ध झाली होती होती परंतु काही अडचणी निर्माण झाल्याने जैसे थे परिस्थिती निर्माण झाली. याचा फायदा घेत काही जणांनी त्या जागेवर डोळा ठेवला होता . शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागातही या समाजासाठी जागा उपलब्ध होऊ शकली नाही. समाजाचे दिग्ग्ज नेते आहेत. अनेक जण समाजातून व समाजामुळे मोठे झाले आहेत पण समाजासाठीचा सभागृहाचा विसर पडलेला दिसतो.आहे
भुसावळ शहरात आसपासची खेडी व बाहेर गावाहून या समाजाचे अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. काही विद्यार्थी खोली भाडयाने घेऊन महाविद्यालयात ये जा करतात. पण या विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह सुद्धा उपलब्ध नाही. समाजाचे मतदार मतदानाचा हक्क बजावण्यात आघाडीवर असतात पण ज्यांना निवडून देतात त्यांच्याकडे समाजाच्या सभागृह आणि वस्तीगृहा साठी पाठपुरावा करण्यासाठी कमी पडतात का ? असाही विचार सर्व सामान्य नागरिकांच्या मनात येत असतो. शहरातील अनेक मुख्य रस्त्यांना महापुरुषांची व संतांची नावे देण्यात आली आहेत. पण लेवा समाजाच्या संतांच्या नावे कुठला मार्ग असले तर तसे फलकही नाहीत. या समाजाच्या संतांच्या नावे व्यापार संकुलही असल्याचे स्मरणात नाही.
यासर्व बाबी पाहता बहूसंख्य असलेल्या लेवा समाजाचा केवळ मतदानासाठीच वापर केला जातो का ? असा अनुत्तरित प्रश्न झाल्या शिवाय राहत नाही.