मुंबई :- उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे राजभवनात 1 आणि 2 मे रोजी महाराष्ट्र स्थापना दिवसाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे उपस्थित होते.
या वर्षी लखनौ मध्ये होणारा महाराष्ट्र दिवस सोहळा उत्तर प्रदेश सरकार, महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र समाज लखनौ, मराठी समाज उत्तर प्रदेश आणि भातखंडे संगीत विश्वविद्यालयाच्यावतीने 1 आणि 2 मे रोजी राजभवनातच आयोजित करण्यात आला आहे. 1 मे रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुख्य अतिथी असतील, तर उत्तर प्रदेशाच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ति श्री दिलीप बाबासाहेब भोसले आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री श्री विनोद तावडे हे विशेष अतिथी असतील. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा आणि सूचना मंत्री डॉ. नीळकंठ तिवारी हेही उपस्थित राहतील. 2 मे रोजी समारोपाच्या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री केशवप्रसाद मौर्य तसेच मंत्री मंडळातील ज्येष्ठ मंत्री डॉ. रीता बहुगुणा जोशी, श्री लक्ष्मी नारायण चौधरी, श्री आशुतोष टंडन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील.असेही राज्यपाल श्री.नाईक यांनी सांगितले.
समारोहातील सांस्कृतिक कार्यक्रमाची व्यवस्था महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केली असून पहिल्या दिवशी‘’भूपाळी ते भैरवी’’ या संघातर्फे महाराष्ट्रातील16 लोककला प्रकारांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये भूपाळी, ओवी,आदिवासी नृत्य, कोळी नृत्य, छत्रपति शिवाजी महाराजांची आग्राहून सुटका यावर आधारित नाट्यनृत्य तर अहिल्याबाई होळकर आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई तसेच लोकमान्य टिळकांची भूमिका असलेला गणेशोत्सव आदी विविध प्रकारचे 16 लोककला प्रकार सादर करण्यात येणार आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजे2 मे रोजी ‘नाट्यसंगीताची वाटचाल’ हा श्री अरविंद पिळगावकर आणि अन्य कलाकारांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीही 1 आणि 2 मे 2017 रोजी लखनौ मधील मराठी संस्थांच्यावतीने राजभवनातच महाराष्ट्र दिवसाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक श्री श्रीधर फडके यांनी मराठीचे वाल्मिकी ग.दि.माडगुळकर यांच्या गीत रामायणाचा कार्यक्रम प्रस्तुत केला होता अशी माहितीही राज्यपाल श्री.नाईक यांनी दिली.