भुसावळ । आयुष्यातील पहिलीवहिली 25 वर्षे शिक्षणाची असतात. शिक्षण घेऊन देश, समाज आणि आपले आई – वडिल यांचे ॠण विद्यार्थ्यांनी फेडले पाहिजे. समाजातील आर्थिकदृष्ट्या गरिब आणि गरजु विद्यार्थ्यांना मिळणारी शैक्षणिक साहित्याची मदत हे समाजातील दात्यांनी त्यांच्यावर केलेले एक प्रकारचे ॠण असते. देशासह समाजाच्या ॠणांची व सामाजिक जाणीवांचे ज्ञान असणारी व्यक्ती खर्या अर्थाने हुशार असते. अशी हुशार व्यक्ती बनण्याचे प्रत्येक विद्यार्थ्यांचे ध्येय असावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा कथाकथनकार प्रा. वसंत होले यांनी केले. येथील स्व. विश्वनाथ चौधरी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गरिब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
येथील जुना सातारा परिसरातील भोळे नगरातील रहिवासी स्व. विश्वनाथ नरसो चौधरी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ द.शि. विदयालय व कनिष्ठ महाविद्यालयात अंतर्नाद प्रतिष्ठानद्वारा 21 रोजी शाळेतील आर्थिकदृष्ट्या गरिब आणि गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. होले होते. व्यासपीठावर प्राचार्या राजश्री सपकाळे, नगरसेवक मुकेश पाटील, मनसेचे तालुकाध्यक्ष विनोद पाठक, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील, ज्योती चौधरी, वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य तथा सर्पमित्र सतीश कांबळे, के. नारखेडे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक डी.व्ही. इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी स्व.विश्वनाथ चौधरी यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. प्रास्ताविकात अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी उपक्रमाच्या आयोजनाचा हेतु स्पष्ट करुन अशा समाजोपयोगी कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच चौधरी कुटुंबियांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करुन हा निर्णय इतरांना प्रेरित करणारा आहे असे सांगितले.