गावठी हातभट्टी उद्ध्वस्त ; तिघांविरोधात गुन्हा

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे वॉश आऊट : 25 हजारांची गावठी दारू जप्त : तिघांविरोधात गुन्हा दाखल

मुक्ताईनगर : तालुक्यातील इच्छापुर-निमखेडी व बेलसवाडी या तीन ठिकाणी मुक्ताईनगर पोलिसांनी अवैध गावठी भट्टीवर धाड टाकत 23 हजार रुपयांच्या गावठी दारूसह मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अवैध दारू भट्टीवर पोलिसांचा छापा
शनिवार, 12 फेब्रुवारी रोजी इच्छापूर शिवारात पत्र्याच्या शेडमध्ये गावठी दारूची भट्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल शैलेश चव्हाण, प्रदीप पिंगळे, रवींद्र मेढे, माधव गोरेवार, अंकुश बाविस्कर, सुरेश पाटील, हरीश गवळी, माधव पोहेकर, अंकुश बाविस्कर ,सागर सावे तसेच अंतुर्ली पोलिस दूरक्षेत्राचे अभिमान पाटील, संतोष चौधरी ,उमेश महाजन, विशाल पवार, यांच्या पथकाने ही वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
इच्छापूर येथील विलास महादेव कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीताच्या ताब्यातील 15 हजार 700 रुपये किमतीचे कच्चे रसायन पक्के रसायन व गावठी हातभट्टीची तयार दारू व त्यास लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. दुसरी कारवाई इच्छापूर-निमखेडी गावातील जुन्या पाणी सप्लायरच्या विहिरीजवळ इच्छापूर शेती शिवारात करण्यात आली. सहा हजार 500 रुपये किंमतीचे गुळमिश्रित कच्चे व पक्के रसायन तसेच तयार दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी आरोपी परशुराम सखाराम बेलदार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तिसरी कारवाईत बेलसवाडी गावाजवळील बसस्थानक चौकात सुरेश काशीनाथ सोनार (बेलसवाडी) याच्या ताब्यातून 600 रुपये किंमतीची गावठी हातभट्टीची दारू दहा लिटर तयार जप्त करण्यात आली व गुन्हा दाखल करण्यात आला.