वडोदा परीसरातील लांडग्याने पाडला 14 बकर्‍यांचा फडशा

वडोदा परीसरातील शेतशिवारातील घटना : पशूपालकांमध्ये पसरली घबराट

मुक्ताईनगर : तालुक्यातील वडोदा येथे लांडग्यांने केलेल्या हल्ल्यात 14 बकर्‍यांंसह बोकडाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार, 14 रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेनंतर पशूपालकांमध्ये घबराट पसरली असून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे. या घटनेमुळे शेतकर्‍याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून वनविभागाने भरपाई देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेतातील कळपावर चढवला हल्ला
शालिग्राम निनाजी बोदडे (वडोदा) यांनी आपल्या वडोदा येथील गट क्रमांक 268 शेतामध्ये बकर्‍यांचा कळप लावल्यानंतर ते जेवण करण्यासाठी त्यांच्या घरी वडोदा येथे गेले असता अचानक लांडग्याने हल्ला चढवल्याने 14 बकर्‍यांसह बोकडांचा मृत्यू ओढवला तर काही बकर्‍या जखमी झाल्या. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शेतकर्‍याने गावातील काही ग्रामस्थांसह व शिवसेना उप तालुकाप्रमुख नवनीत पाटील यांना फोनवर माहिती दिली असता नवनीत पाटील यांनी तत्काळ वनविभागाच्या कुर्‍हा वनपाल बी.आर.मराठे व वनपाल पाचपांडे यांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी धाव घेतली व त्यांनी नुकसानीची माहिती जाणून घेत पंचनामा केला. शालिग्राम निना बोदडे यांच्या शेताला तार कंपाउंड असलेतरी लांडग्याने हल्ला चढवत बकर्‍यांचा फडशा पाडला. आमदार चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी रात्रीच भ्रमणध्वनीवरून संपूर्ण माहिती जाणून घेत वनविभागाला पंचनामा करून भरपाई देण्याबाबत सूचना दिल्या.