मुंबई: – स्व. खा. चिंतामण वनगांच्या पत्नी आणि मुलाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेत प्रवेश केला. वनगांच्या निधनानंतर भाजपने आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप वनगा कुटुंबियांनी केल्यानंतर भाजपने मात्र हा आरोप नाकारला असून पालघर लोकसभेसाठी त्यांच्याच परिवारातील सदस्याला उमेदवारी देण्यात येणार होती. मात्र त्याआधीच त्यांनी पक्ष सोडला. हे दुर्दैवी असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
हे देखील वाचा
मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले की, गेली ३७ वर्षे भाजपने वनगा कुटुंबियांना भरपूर दिले. स्वर्गीय खा. चिंतामण वनगा यांचे पक्ष संघटनेसाठी चांगले काम आहे. त्यांच्या कुटुंबियातीलच कुणाला तरी उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरु होती. याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा राहील असेही पाटील यावेळी म्हणाले.
भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगांच्या नाराज कुटुंबियांनी भाजपविरोधात दंड थोपटले आहेत. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे वेळ मागितली. मात्र ती देण्यात न आल्याची खंतही त्यांनी गुरुवारी व्यक्त करर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती मातोश्रीवर शिवबंधन बांधून घेतले आहे.