वरणगांव महात्मा गांधी विद्यालयात ३५ लाख रुपयांचा अपहार !
वेतनेत्तर अनुदान अपहार प्रकरण - मुख्याध्यापकांवर ठपका, वरणगांव परिसरात खळबळ
वरणगांव । प्रतिनिधी
वरणगांव येथील महात्मा गांधी विद्यालयातील वेतनेतर अनुदानातुन करण्यात आलेला ३५ लाख ९० हजार रुपयांचा खर्च लेखा परीक्षणात अमान्य करण्यात आला आहे. या खर्चास मुख्याध्यापिका वंदना चव्हाण जबाबदार असल्याचा ठपका लेखा परिक्षण अहवालात नमूद करण्यात आला असून सदरची रक्कम त्यांचेकडून वसुलीस पात्र ठरत असल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का? करण्यात येवू नये याबाबत तिन दिवसात खुलासा करावा असे शिक्षणाधिकारी (माध्य.) यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे . यामुळे वरणगांवच्या शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे .
वरणगांव व परिसरात शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेली दि. वरणगाव एज्युकेशन सोसायटी संचलीत महात्मा गांधी विद्यालय सद्यस्थितीत संस्था चालकांचा सत्तेचा वाद व अनुदान अपहार प्रकरणामुळे चांगलेच चर्चेत आले आहे. या विद्यालयात सन -२०१५/१६ ते २०२२/२३ या कालावधीत वेतनेत्तर देय असलेल्या शासकीय रकमेत मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याची तक्रार माजी संचालक रविंद्र भागवत कोल्हे यांनी शिक्षण विभागाकडे केली होती. यामुळे संस्थेचे लेखा परिक्षण करण्यात आले . व त्यानुसार लेखा परीक्षणात वेतनेत्तर अनुदानात ३५ लाख ९० हजार ४९ रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचे आढळून आल्याने संस्थेचे सचिव यांनी मुख्याध्यापिका, बनावट अध्यक्ष, शाळा समिती चेअरमन यांनी यांचेवर सदरहू गैरव्यवहार अपहार रकमेच्या बाबत मा. शिक्षण उपसंचालक नाशिक यांचेकडे तक्रार केली आहे. त्यानुसार मुख्याध्यापिका वंदना चव्हाण यांच्यावर शिस्तभंगाचा ठपका ठेवण्यात आला असुन त्या शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरत असल्याचे आदेशात नमुद करण्यात आले आहे . तसेच मुख्याध्यापिका वंदना चव्हाण यांना देण्यात आलेल्या आदेशात अपहाराच्या रकमेबाबत तिन दिवसाच्या आत खुलासा सादर करण्याचे नमुद केले असून खुलासा समाधानकारक व मुदतीत नाही दिल्यास शिक्षण विभागाच्या अधिनियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे जि.प. जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.या अपहार प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून अपहार प्रकरणातील मुख्य सुत्रधारांचे काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे .
*मुख्याध्यापिकांची बोलण्यास टाळाटाळ*
सदरहू अपहार प्रकरणी मुख्याध्यापिका सौ . वंदना चव्हाण यांचेवर लेखा परिक्षण अहवालानुसार ३५ लाख ९० हजार ०४९ रुपयांचा ठपका ठेवण्यात आला असून हि रक्कम वसुलीस त्या पात्र ठरलेल्या असल्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांनी दिलेल्या आदेश पत्रात नमूद केले आहे . या बाबतीत मुख्याध्यापिका सौ . वंदना चव्हाण यांचेशी भ्रमणध्वनी वर संपर्क साधला असता त्यांनी सुरुवातीला माझा भ्रमणध्वनी क्रमांक तुम्हाला कुणी ? दिला अशी विचारणा करीत प्रतिक्रिया देण्याचे टाळले.