वरणगांव नगर परिषद स्थलातंराच्या विषयाला येतेय रंगत

 कृती समिती राबवित आहे स्वाक्षरी मोहीम

वरणगांव । प्रतिनिधी

वरणगांव नगर परिषद कार्यालयाचे नविन इमारतीत स्थलांतरीत करण्याच्या ज्या पद्धतीने हालचाली गतीमान केल्या आहेत त्याच पद्धतीने कार्यालय स्थलांतर विरोधी कृती समितीनेही हालचाली गतीमान केल्या असून शहरात स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे. यामुळे या विषयाला चांगलीच रंगत येत आहे.

वरणगांव ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रुपातंर होताच प्रशासनाच्या माध्यमातुन ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीची दुरुस्ती, रंगरंगोटी करण्यात आली. तसेच अधिकाऱ्यांच्या संख्येनुसार इमारतीच्या कार्यालयात फेरबदल करून स्वतंत्र विभाग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, इमारतीची जागा कमी पडत असल्याच्या कारणावरून तत्कालीन सत्ताधारी नगराध्यक्षा अरुणाबाई इंगळे यांनी बहुमताच्या आधारावर नगर परिषद कार्यालय स्थलांतर करण्याचा ठराव केला. तर या विषयाला सुचक म्हणून सुनिल काळे यांचे नाव टाकण्यात आले त्यानुसार विश्राम गृहाच्या लगतच्या जागेवर व्यापारी संकुल व सुसज्ज असे नगर परिषदेच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले असुन या इमारतीचे काम शेवटच्या टप्प्यात आल्याने नगरपरिषद प्रशासनाने आपला शासकीय कारभार या इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याची वार्ता कानोकान पसरताच नागरीकांनी नगर परिषद कार्यालयाला स्थलांतरीत करण्याच्या कार्याला विरोध दर्शवला आहे. इतकेच नव्हेतर स्थलांतर विरोधी कृती समिती करून गावात स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे. यामुळे मुख्याधिकारी व प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.

 ठरावाला यांनी केला होता विरोध

नगर परिषद कार्यालय स्थलांतर करण्याचा ठरावाला यावेळी नगरपरिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते राजेंद्र चौधरी, विष्णू खोले, रविंद्र सोनवणे, प्रतिभा समाधान चौधरी, गणेश चौधरी व इतर नगरसेवकांनी विरोध दर्शविला होता. इतकेच नव्हेतर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अशफाक काझी, पंकज पाटील व पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे हरकत नोंदवली होती. मात्र, याला न जुमानता सन २०२१ – २२ मध्ये नगरपरिषदेच्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली.

स्थलांतर विरोधी कृती समिती मध्ये यांचा आहे समावेश

नगर परिषद कार्यालय सर्वांच्या सोयीसाठी गावातच असावे या मागणीसाठी स्थलांतर विरोधी कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये आशिष चौधरी (अध्यक्ष ), अशफाक काझी (उपाध्यक्ष ), महेश सोनवणे ( सचिव ), तर सदस्य म्हणून भास्कर (अप्पा) गवळी, शशिकांत चौधरी, मनोज कोलते, संतोष माळी, सुनिल भोई, संदीप वाघ, अतुल झांबरे, अतुल पाटील, संजीव कोळी, अजय सोनार, बब्बु भाई, प्रकाश मराठे, किरण माळी इत्यादींचा समावेश आहे. या कृती समितीच्या माध्यमातुन शहरात स्वाक्षरी मोहीम राबविली जात असुन नागरीकांचा यासाठी उर्स्फुत असा प्रतिसाद मिळत आहे.