वझरखेडे ग्रा.प. कार्यालय बांधकामाला जाताहेत तडे

(बांधकाम नित्कृष्ठ दर्जाचे ठेका लोक प्रतिनिधीच्या जवळच्याच कार्यकर्त्याचा ? चौकशीची मागणी - अन्यथा उपोषण 

भुसावळ । प्रतिनिधी

वझरखेडे येथे शासनाच्या निधीतुन ग्रा.पं. कार्यालयाच्या नविन इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे . मात्र, सुरु असलेले काम नित्कृष्ट दर्जाचे होत असुन या कामाला इतर शासकीय कामा प्रमाणेच नित्कृष्ट दर्जाची लागण झाली असुन बांधकामाला तडे जात आहेत. यामुळे या कामाची सखोल चौकशी करावी अन्यथा जि. प. कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे .

राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील जिर्ण अवस्थेत आलेल्या ग्रामपंचायतीच्या इमारतीचे नव्याने बांधकाम सुरू करण्यात आले आहे . यामध्ये वझरखेडे ता . भुसावळ येथील ग्रामपंचायतचाही समावेश असुन नविन इमारत बांधकामासाठी २२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे . मात्र, होणाऱ्या बांधकामासाठी नित्कृष्ठ दर्जाचे सिमेंट, वाळु, विटा असे साहीत्य वापरले जात आहे . इतकेच नव्हे तर इमारतीचा मुख्य पाया केवळ दोन फुटाचा खोदण्यात आला असुन बांधकाम सुरू असतानांच भिंतीला तडे जात आहेत . यामुळे इतर शासकीय कामा प्रमाणेच या बांधकामालाही नित्कृष्ठ दर्जाची लागण झाली असल्याचे दिसून येत आहे . परिणामी भविष्यात ग्रामपंचायतीच्या इमारतीमुळे नागरीकांच्या जिवीताला धोका पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही . यामुळे या बांधकामाची सखोल चौकशी करण्यात यावी . तसेच बांधकाम ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे अन्यथा जि.प. कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल अशा मागणीचे निवेदन दि .६ मे २०२३ रोजी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता जळगांव यांना देण्यात आले असून निवेदनावर कैलास निकाळजे यांच्यासह १५ ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत .

ठेकेदार लोकप्रतिनिधीच्या मर्जीतला

जिल्ह्यातील जिर्णावस्थेत आलेल्या ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम जळगांव येथील मजुर फेडरेशन संस्थेला मिळाले आहे . यापैकी वझरखेडे येथील ग्रा.पं. चे बांधकाम तालुक्याचे लोकप्रतिनिधीच्या मर्जीतल्या कार्यकर्त्याला देण्यात आले असुन या मातब्बर ठेकेदार कार्यकर्त्याने आपल्या जवळच्या वैभव महाजन यांच्या नावे हा बांधकामाचा ठेका घेतला असल्याने आपल्या मर्जीप्रमाणे नित्कृष्ठ दर्जाचे बांधकाम केले जात असल्याचा आरोप होत आहे . तसेच या बांधकामाच्या ठिकाणी अद्यापही तालुका स्तरावरील बांधकाम अभियंता यांनी पाहणी केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असुन तालुक्याचे आमदार याकडे लक्ष देतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे .

मंजुर निवीदा देण्यास टाळाटाळ

सदरहू होत असलेल्या २२ लाख रुपयांच्या बांधकामाबाबत शासकीय निवीदेची ग्रा.पं. कार्यालयाकडुन आठ दिवसापूर्वी रितसर मागणी करण्यात आली आहे . मात्र, बांधकाम विभागाकडून निवीदेची प्रत देण्यास टाळाटाळ केली जात असून मातब्बर ठेकेदार कार्यकर्ता काम लवकरात लवकर आटोपून आपली रक्कम काढून घेण्याच्या तयारीत दिसुन येत आहे . यामुळे ठेकेदाराला राजकीय अभय कुणाचे ? याबाबत ग्रामस्थांमध्ये उघड – उघड चर्चा होवू लागली आहे .