भुसावळात वाहनांची जाळपोळ: जमावाविरुद्ध गुन्हा दाखल

0

भुसावळ : भरधाव टाटा पिकअप वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास खडका चौफुलीजवळ घडली होती. या अपघातानंतर संतप्त जमावाने धडक देणार्‍या पीकअप वाहनासह एका टाटा मोबाईल वाहनाचीही जाळपोळ केली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात सुरुवातीला अपघातात मृत्यूस ठरल्याप्रकरणी पीकअपच्या अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता तर शुक्रवारी रात्री दोन वाहनांची जाळपोळ केल्याप्रकरणी अज्ञात जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, अपघातात मृत झालेल्या हर्षल गणेश कोळी (20, कोळीवाडा, भुसावळ) या तरुणावर शुक्रवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

संतप्त जमावाने पेटवली दोन्ही वाहने

हर्षल गणेश कोळी (20, कोळीवाडा, भुसावळ) व शुभम लोहार हे दोन्ही मित्र वरणगावकडून साकेगावकडे दुचाकी (एम.एच.19 डीजे 7243) ने जात असताना भरधाव टाटा पिकअप (एम.एच.19 सीवाय.3966) ने जोरदार धडक दिल्याने हर्षल कोळीचा जागीच मृत्यू झाला तर शुभम हा जखमी झाला होता. राष्ट्रीय महामार्गावरील खडका चौफुलीजवळील बालाजी तोलकाट्याजवळ हा अपघात झाल्यानंतर संतप्त जमावाने दुचाकीला धडक देणार्‍या टाटा पिक अपसह पाठीमागून येणार्‍या टाटा मोबाईल वाहन (एम.एच.19 बी.एम.4533) ला पेटवून दिले होते.
शुक्रवारी रात्री बाजारपेठ पोलिसात चालक आशिष नरेंद्र परदेशी (31, तुळजाभवानी मंदिरासमोर, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार 6 ते 7 जणांच्या अज्ञात जमावाविरुद्ध दोन वाहनांची जाळपोळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीचा आशय असा की, 24 रोजी रात्री 11.10 वाजेच्या सुमारास आशिष परदेशी हे टाटा झेनॉन वाहन (एम.एच.19 सी.वाय.3966) ने काम संपवून घराकडे निघाले असताना खडका चौफुलीवर दुचाकीवरून आलेल्या दुचाकीस्वारांनी वाहनाला धडक दिल्याने ते खाली पडले व एकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला तर इतक्यात पाठीमागून दुचाकीवर आलेल्या पाच ते सात जणांनी फिर्यादीच्या ताब्यातील गाडीला आग लावा, असे सांगत वाहन पेटवले तसेच पाठीमागून येत असलेले वाहन (एम.एच.19 बी.एम.4533) ला आग लावून पेटवून दिले. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मोरे करीत आहेत.