ज्येष्ठ रंगकर्मी नेताजी भोईर यांचे निधन

0

नाशिक – ज्येष्ठ रंगकर्मी, नामवंत संहिता लेखक नेताजी भोईर यांचे आज सकाळी निधन झाले. वृद्धापकाळामुळे वयाच्या ९० व्या वर्षी त्यांचे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. एकाच वेळी संहिता लिखाण करणारा आणि त्याबरोबरच दिग्दर्शन करणारा रंगकर्मी अशी नेताजी भोईर यांची ओळख होती.

विजय नाट्य मंडळाच्या माध्यमातून भोईर यांनी रंगभूमीशी आपले नाते अधिक घट्ट केले होते. महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेत सलग ५० वर्षे नाटक सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे ते काही काळ अध्यक्षही होते. शिवाय, विविध नाट्य संस्थांशी त्यांचा निकटचा संबध होता.

मराठी रंगभूमीवरील कारकीर्दीत त्यांना अनेक मान-सन्मान प्राप्त झाले. वयाच्या ८० व्या वर्षी नाशिककरांच्या वतीने त्यांचा जाहीर नागरी सत्कारही करण्यात आला होता. दरम्यान, नेताजी भोईर यांच्या निधनामुळे जिल्ह्यातील रंगभूमीवरील अतुलनीय व्यक्तिमत्व हरपल्याची भावना रंगभूमीवरील कलाकारांनी व्यक्त केली.