नवी दिल्ली : दिल्लीच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे काल निधन झाले. आज रविवारी दुपारी २.३० वाजता दिल्लीतल्या निगमबोध घाट येथे त्यांचं पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शीला दीक्षित यांचं पार्थिव घरी आणल्यानंतर त्यांच्या घरासमोर अंत्य दर्शन घेणाऱ्यांची मोठी रांग लागलेली आहे. कुटुंबीयांसमोबतच काँग्रेस पक्षाचे तसंच इतर पक्षांचे नेतेही उपस्थित आहेत. शीला दीक्षित यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी, युपीए अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी दीक्षित यांचा मुलगा संदीप दीक्षित आणि त्यांच्या पत्नीला धीर दिला.