VIDEO:काश्मिरी विद्यार्थ्यांनी केला राष्ट्रगीताचा अपमान

0

श्रीनगर-राष्ट्रगीतादरम्यान उठून उभे न राहिल्याने काही काश्मिरी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा प्रकार समोर आला आहे. श्रीनगरमधील सेन्ट्रल युनिव्हर्सिटी ऑफ काश्मीरमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ४ जुलै रोजी झालेल्या विद्यापीठातील दीक्षांत समारंभादरम्यान हा प्रकार घडला आहे.

दीक्षांत समारंभामध्ये जेव्हा राष्ट्रगीत सुरु झाले तेव्हा काही विद्यार्थी आपल्या खुर्च्यांवर तसेच बसून राहिलेले या व्हिडिओत स्पष्टपणे दिसतात. तर इतर सर्व विद्यार्थी राष्ट्रगीतासाठी उभे राहिलेले दिसत आहेत. दरम्यान, या व्हिडीओबाबत बोलताना विद्यापीठाचे रजिस्ट्रार प्रा. एम. अफजल जरगार म्हणाले, दीक्षांत समारंभादरम्यान मुख्य सभागृहात जितके विद्यार्थी होते ते सर्व राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे होते. मात्र, हा व्हिडिओ कुठल्या भागातला आहे हे आम्हाला माहिती नाही. कदाचित तो बनावट व्हिडिओ असावा. आमच्या माहितीनुसार आजवर एकदाही अशी घटना समोर आलेली नाही जेव्हा राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ कोणीही विद्यार्थी बसून राहिलेला आहे.

सेन्ट्रल युनिव्हर्सिटी ऑफ काश्मीरच्या व्हिडीओला सोशल मीडियावर श्रीनगरच्याच एका दुसऱ्या शेर-ए-काश्मीर विद्यापीठाच्या नावानेही शेअर केला जात आहे. मात्र, या व्हिडीओचा शेर-ए-काश्मीर विद्यापीठाशी काहीही संबंध नाही आणि बुधवारी येथे कोणताही दीक्षांत समारंभही नव्हता. यापू्र्वीही राष्ट्रगीताच्या अपमानाबाबत अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये जम्मू-काश्मीरच्या राजौरतील बाबा गुलामशहा बादशाह विद्यापीठामध्येही असाच प्रकार घडला होता. जेव्हा विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीतादरम्यान उभे न राहता अपमान केला होता.