जळगाव : शहरातील सेंट्रल फुले मार्केटमधील सोनी मेन्सवेअर हे कपड्यांचे दुकान फोडून चोरट्यांनी दुकानातील पन्नास हजार रुपयांच्या कपड्यांचा माल लांबविला होता . या गुन्ह्याच्या शहर पोलिसांनी अवघ्या काही तासातच छडा लावला असून मुद्देमालासह एका अल्पवयीन चोरट्यास ताब्यात घेतले आहे .
काय घडली होती घटना
सिंधी कॉलनीतील सनी राजकुमार मतानी (वय-29) यांचे सेंट्रल फुले मार्केटमध्ये दुकान नं ९८ मध्ये सोनी मेन्सवेअर नावाने रेडीमेड कपड्यांचे दुकान आहे. लॉकडाऊन असल्याने गेल्या 23 मार्च पासुन संपर्णु मार्केट बंद असुन चोरट्यांनी याचा गैर फायदा घेत मंगळवारी मध्यरात्रीनंतर दुकानाचे कुलूप तोडून आतील 200 जिन्स पॅन्ट 199 टिशर्ट असा एकुण 49 हजार 500 रुपयांचा माल लंपास केला आहे. वॉचमन विनोद अशो करोसीया (रा.शनिपेठ) यांना बुधवारी सकाळी दुकानाचे लॉक तुटल्याचे आढळून आल्यानंतर प्रकार समोर आला. याप्रकरणी दुकान मालक सनी मतानी यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीसीटीव्हित कैद झाला होता चोरीचा प्रकार
दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चोरीचा प्रकार कैद झाला होता. पहाटे दीड वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून तिघेही चोरटे एका भल्या मोठ्या पिशवीत रेडिमेड कपडे भरत असल्याचे दिसून येत होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अरुण निकम यांना सुचना व मार्गदर्शन केले होते. अरुण निकम यांनी गुन्हे शोध पथकाला गुन्हा उघड करण्याच्या सूचना केल्या होत्या. गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल योगेश इंधाटे व तेजस मराठे यांना पिंप्राळा हुडकोतील अल्पवयीन चोरट्यांनी हा गुन्हा केला असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शोधपथकातील विजय निकुंभ बशीर तडवी, गणेश साळवे, अक्रम शेख ,भास्कर ठाकरे, गणेश पाटील, सुधीर साळवे तेजस मराठे, योगेश इंधाटे यांच्या पथकाने पिंप्राळा हुडकोतील एका अल्पवयीन चोरट्यास ताब्यात घेतले त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून गुन्ह्यातील पन्नास हजार रुपयांच्या कपड्यांचा माल जप्त करण्यात आला.त्याचे इतर दोन साथीदार फरार असून त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल बशीर तडवी हे करीत आहेत