मोदींच्या सभेत मागितली भाषणाची संधी
जळगाव: आज विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जळगावात सभा होत आहे. खान्देशातील उमेदवारांसाठी ही सभा होणार आहे. राज्यात भाजप-सेनेची युती असल्याने सेनेचे उमेदवार देखील व्यासपीठावर असणार आहे. दरम्यान जळगाव ग्रामीणचे शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या विरोधात भाजपचे नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अत्तरदे हे प्रचारात भाजपचा चिन्ह आणि साहित्य वापरत असल्याने गुलाबराव पाटील यांनी मोदींच्या सभेच्या ठिकाणी आपला संताप व्यक्त केला. ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत, त्याठिकाणी शिवसेना प्रामाणिक काम करत आहे, मात्र ज्या ठिकाणी सेनेचे उमेदवार आहेत, तेथे भाजपचे पदाधिकारी बंडखोरी करत आहे. हे चुकीचे असून भाजपा पक्षश्रेष्टीने याची दाखल घ्यावी अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
तसेच गुलाबराव पाटील यांनी मोदींच्या सभेत मला भाषणाची संधी द्यावी अशी मागणी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. मात्र त्यांना संधी मिळते का? याकडे लक्ष लागून आहे.
भाजपने बंडखोरांवर कारवाई करावी अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी केली आहे. याबाबत मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील तक्रार केली आहे असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.